Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्याला चार नद्यांच्या पुराचा वेढा'; भीमा, भोगावती, नागझरीलाही पूर

 मोहोळ तालुक्याला चार नद्यांच्या पुराचा वेढा'; भीमा, भोगावती, नागझरीलाही पूर




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा, सीना, भोगावती व नागझरी या नद्या तुडुंब भरून वाहत आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मोहोळ तालुक्याला या चार नद्यांच्या महापुराचा अक्षरशः वेढा घातला आहे.
उजनी व वीर धरणातून भीमा नदीत विसर्ग सुरू आहे. तर परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगर रांगेत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. बार्शी तालुक्यातील सर्व प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे भोगावती व नागझरी नदीला पूर आला आहे. भीमा नदी मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहते. सीना, भोगावती व नागझरी या नद्या मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातून वाहत आहेत. मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या चारही नद्यांच्या पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात नदीपात्र बाहेर पडले आहे. तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील व बागायती पिके जागच्या जागी नासू लागली आहेत.
मोहोळ तालुक्यातील एकुरके ते मलिपेठदरम्यान सीना नदीच्या पाण्याने बामण पट्टा, हजारे वस्ती व सौदागर मोरे यांच्या शेतातून वाट काढत प्रवाह बदलला आहे. त्यामुळे शेतातील पिके व मातीही मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे पिके पिवळी पडून जागीच जळून जात आहेत.
जाधव वस्तीचा सहा दिवसांपासून संपर्क तुटला
वाळूज गावाकडील भोगावती नदीला व मुंगशीकडील नागझरी नदीला व साखरेवाडी (ता. उत्तर सोलापूर) कडील काटओड्याला पूर आल्यामुळे वाळूज (ता. मोहोळ) येथील दीडशे कुटुंब व पाचशे लोकसंख्या असलेल्या जाधव वस्तीचा सहा दिवसांपासून संपर्क तुटल्याची माहिती जाधव वस्तीतील शंकर मोटे यांनी सकाळला सांगितली. नद्यांना व ओढ्याला दिवसेंदिवस पाणी वाढतच आहे. त्यामुळे पाणी कधी कमी होईल सांगता येत नाही. प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments