सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील बंधारे पाण्यात
माढा (कटूसत्य वृत्त):- सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील सीना नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच माढा-वैराग अर्थात माढा-तुळजापूर ही वाहतूक ठप्प झाली आहे. परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या सर्व गावांमध्ये पूर्वपरिस्थिती निर्माण झालेली आहे.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार अभिजित पाटील यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्तभागाची बुधवारी (ता. १७) पाहणी केली.
माढा तालुक्यातील सीना नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. सीना नदीकाठी असलेल्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची उडीद, ऊस, मका यासारख्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. मुंगशी, चोभेपिंपरी या भागातील शेतकऱ्यांच्या केळी व इतर बागा पाऊस व वाऱ्यामुळे जमीन दोस्त झाले. नदीकाठच्या शेतकऱ्यांबरोबरच नदीकाठी नसलेल्या शेतकऱ्यांचीही या पावसामुळे नुकसान झालेले आहे.
शाळांना सुट्टी, बससेवा होती बंद
सीना नदीकाठी पूरस्थिती असल्याने पुराचा धोका संभवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतून सुट्टी देण्यात आली. पुलावर पाणी असल्याने अनेक शिक्षकांना शाळेपर्यंत पोचता आले नाही. माढा - वैराग बससेवाही बंद राहिली.
चौकट-
लोकांना मदत आवश्यक असल्यास संपर्क करण्याचे आव्हान सकाळीच समाज माध्यमावर केले होते. पूरपरिस्थिती ओसरल्यावर लगेच प्रशासनाने लगेच पंचनामे करावेत. या पूरस्थितीचे व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवणार असून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी करणार आहे.
- प्रा. शिवाजीराव सावंत, माजी सदस्य, जिल्हा परिषद, मानेगाव
चौकट-
शासनाने नुकसान भरपाईसाठी ठरवून दिलेले निकष बाजूला ठेवत अपवादात्मक परिस्थिती म्हणून माढा विधानसभा मतदारसंघ, माढा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अतिवृष्टीच्या नुकसानीच्या निकषात सध्याची परिस्थिती बसत नसली तरी शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा विचार करावा. भीमा नदीतील पाणी पाचवेळा शेतकऱ्यांच्या शेतातून वाहून गेलेले आहे. सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचेही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे ६० मिलिमीटर पाऊस, सलग पाच दिवस पाऊस यासारखे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी.
- अभिजित पाटील, आमदार, माढा विधानसभा मतदारसंघ
0 Comments