Hot Posts

6/recent/ticker-posts

उजनीतून पाणी सोडूनही ८६ तलाव अंशतः भरले'; उजनी कालव्यातून तलाव भरून घेणे आवश्यक

 उजनीतून पाणी सोडूनही ८६ तलाव अंशतः भरले'; उजनी कालव्यातून तलाव भरून घेणे आवश्यक    




 माढा (कटूसत्य वृत्त):- उजनी धरणातून तीनवेळा भीमा नदीत पाणी सोडूनही माढा तालुक्यातील पाझर तलाव ६० ते ७० टक्केच्या आसपास भरले आहेत. दरवर्षी सीना- माढा उपसा सिंचन योजनेतून तालुक्यातील अनेक पाझर तलाव भरले जातात. परंतु, यावर्षी संपूर्ण क्षमतेने न भरल्याने उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांसमोर अडचणी उभ्या राहू शकतात.

माढा तालुक्यामध्ये सुमारे १५३ पाझर तलाव आहेत. यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मात्र, तालुक्यातील अनेक पाझर तलाव हे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. माढा तालुक्यातील १५३ पाझर तलावांपैकी ८६ पाझर तलाव हे अंशतः भरलेले आहेत. माढा तालुक्यामध्ये सरासरी ५५० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे.   मात्र, पाझर तलाव‌ पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. सध्या पाऊस चालू असल्याने शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी देण्याची गरज नाही. परंतु, उन्हाळ्यामध्ये तलावांतील पाण्यामुळे विंधन विहिरी, विहिरींची पाणीपातळी वाढून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे सीना- माढा उपसा सिंचन योजना, उजनी धरणाच्या कालव्यातून पाझर तलाव भरून घेण्याची आवश्यकता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून सर्व पाझर तलाव भरून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून दरवर्षी भरले जाणारे तलाव यंदाही पूर्ण क्षमतेने भरून घेतले जाणार आहेत. त्याशिवाय सीना- माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी बंद होणार नसल्याचे आ. अभिजित पाटील यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments