सोलापूरात आभाळ फाटलं! ७२९ गावांना पुराचा फटका, २ लाख हेक्टर शेतीचं नुकसान
- सीना नदीचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील 110 गावांत शिरले
- 185 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले; माढ्यात आर्मीला बोलावले
- पुणे-सोलापूर महामार्गावरील लांबोटी पुलावरील एका बाजूची वाहतूक बंद
- वडकबाळ पुलालगत विजयपूर हायवेवरही पाणी
- आर्मीच्या हेलिकॉप्टरने दारफळ येथे अडकलेल्या आठ नागरिकांना एयरलिफ्टिंग द्वारे बाहेर काढण्यात आले
- शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार २१५ कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. जिकडं तिकडं पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. सोलापूरातील तब्बल ७२९ गावं पाण्याखाली गेली आहे. शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ४९ जनावरं आणि १५ हजारांपेक्षा जास्त कोंबड्या दगावल्या आहेत. पूरग्रस्तांना शक्य तितकी मदत करण्यात यावी असे आदेश प्रशासनाकडून अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे २ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालनुसार १ ते २२ सप्टेंबरपर्यंत तब्बल १ लाख ९५ हजार ६३१ हेक्टर शेतीचे नुकसान झाले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ लाख २२ हजार ८८१ शेतकरी बाधित झाले आहेत. तर जिल्ह्यातील ११ तालुक्यातील तब्बल ७२९ गावांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला आहे.
सप्टेंबर महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ४९ जनावरे, १५ हजार ४१ कोंबड्या देखील दगवल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ५४१ घराची पडझड झाली तर ४०५८ जणांच्या घरात पाणी शिरलं. सोलापूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक अहवालतून माहिती ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अंतिम आकडेवारीत नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुराची परिस्थिती पाहता विभाग प्रमुखांना केंद्र न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूर स्थितीत लोकांना मदतकार्य करण्यासाठी कोणत्याही विभागाचे खाते प्रमुख आणि कर्मचारी मुख्यालय सोडू नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे सीना नदीत २ लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी वाहत असून ५० हजार क्युसेक वहनक्षमतेपेक्षा चारपट पाणी असल्याने ११० गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
आतापर्यंत १८५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून ९ बचाव पथके, ११ बोटी व NDRFच्या टीम्स रात्रंदिवस शोध व बचाव कार्य करत आहेत.
माढा, मोहोळ, बार्शी तालुक्यात शेकडो नागरिकांची यशस्वी सुटका झाली असून दारफळ येथे अडकलेल्या नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी आर्मी हेलिकॉप्टर बोलावण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच सीना कोळेगावसह तीन धरणांतून तसेच भोगावती नदीतून येत असलेल्या पाण्यामुळे सीना नदीने रौद्र रुप धारण केले आहे. सीना नदीची वहनक्षमता 50 हजार क्युसेकची असताना सध्या नदीतून सुमारे दोन लाख क्युसेक पाणी वाहत आहे, त्यामुळे पाणी नदीपात्राबाहेरून वाहत आहे. सीना नदीचे पाणी काठावरील 110 गावांत शिरले असून आतापर्यंत 185 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील सीना पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला आहे. सीना कोळेगाव धरणातून 72 हजार, चांदणीतून 39 हजार 771, खासापुरी धरणातून 35 हजार 839 क्युसेक, तर भोगावती नदीतून 52 हजार असा एकूण 2 लाख क्युसेकचा विसर्ग सीना नदीपात्रात होत आहे. वास्तविक सीना नदीची वहनक्षमता ही पन्नास हजार क्युसेकची आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांत मोठ्या प्रमाणात शिरले आहे.
पूर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्यासाठी प्रशासनाकडून एकूण 9 टीम कार्यरत करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी सोलापूरच्या 5 टीम, कोल्हापूरच्या 2 टीम (त्यापैकी एक कार्यरत आहे एक मदत कार्यासाठी पोचत आहे) व NDRF ची देखील दोन टीमपैकी एक कार्यरत आहे व दुसरी टीम पोहोचत आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी इतर जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अकरा बोटी पुरेशा मनुष्यबळासह उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये कोल्हापूरमधून 3, लातूरमूधन 1, सांगलीतून 3, इंदापूरमधून 2, नांदेडमधून 2 अशा 11 बोटी मागवण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील शोध व बचाव पथक तसेच आपदा मित्र आणि बार्शी नगरपालिका अग्निशमन विभाग यांनी 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत 185 नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका केलेली आहे. जिल्हा आणि तालुका प्रशासन महापुराची परिस्थिती हाताळण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. नागरिकांनी मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 0217-2731012 या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
माढ्यातील बचाव कार्य
माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील सरवदे वस्ती या ठिकाणच्या बाधित 18 लोकांना व एका पाळीव प्राण्याला रेस्क्यू टीमने सुरक्षित बाहेर काढले. पापनस (ता. माढा) येथील 39 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. रिधोरी (ता. माढा) गावातील पुरात अडकलेल्या 8 लोकांनाही सुखरूप बाहेर काढले व इतर 28 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. शिंगेवाडी (ता. माढा) येथील सीना नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेले शिंदे वस्तीवरील नऊ व्यक्तींना बोटीच्या सहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले आहे.
मोहोळ, बार्शीत पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका
मोहोळ तालुक्यातील आष्टे येथे सीना नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या एकूण बारा नागरिकांपैकी ३ महिला व ५ लहान मुले अशा ८ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. बार्शी तालुक्यातील इर्लेवाडीच्या यशवंत नगर वस्तीमध्ये भोगावती नदीचे पाणी आले आहे, त्यामुळे वस्तीवरील कुटुंबाची राहण्याची व्यवस्था कुटुंबाचे नातेवाईक, बिरोबा मंदिर व जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यात आला आहे. या कुटुंबाची जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांमार्फत करण्यात आली आहे
तांदूळवाडी, देगावमध्ये बचावकार्य
तांदुळवाडी येथे सीना नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 27 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. देगाव येथे पुराच्या पाण्यात अडकलेले आतकरे कुटुंबास सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांना देगावच्या जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
माढ्यातील दारफळमध्ये आर्मीला बोलावले
माढा तालुक्यातील दारफळ येथे पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले असून एनडीआरएफ टीमचे पथक बचावासाठी गेले होते. पण, पुराच्या पाण्याचा प्रवाह खूप वेगाने येत असल्याने अडकलेल्या त्या नागरिकांना सुखरूपणे बाहेर काढणे शक्य झाले नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्या नागरिकांना एअरलिफ्टद्वारे बाहेर काढण्यासाठी सैन्य दलाशी चर्चा केली आहे. आर्मीचे हेलिकॉप्टर पथक लवकरच दारफळ येथे पोहोचून सर्व नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही करतील.
सीना नदीतून सुमारे दोन लाख क्युसेक वेगाने पाणी वाहत असून मोहोळ तालुक्यातील लांबोटी पुलाला हे पाणी लागले आहे, त्यामुळे प्रशासानाने दक्षतेचा उपाय म्हणून पुणे-सोलापूर महामार्गावरील लांबोटील पुलावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे, त्यामुळे ही दोन्ही बाजूची वाहतूक एकाच पुलावरून सुरू करण्यात आली आहे. तसेच, सोलापूर-विजयपूर मार्गावरील वडकबाळ पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी साचल्याने या पुलावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे-सोलापूर महामार्गाच्या इतिहासात प्रथमच लांबोटी पुलावरून एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्याची वेळ आली आहे. पुलावर जेसीबी, तीन रुग्णवाहिका आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, करमाळा तालुक्यातील संगोबा येथे पुरात अडकलेल्या सहा जणांची सुटका करण्यासाठी गेलेल्या एनडीआरएफची बोट मध्येच बंद पडली आहे, त्यामुळे एनडीआरएफचे जवान आणि सहाजण मध्येच अडकून पडले आहेत. याच ठिकाणी मंदिरात अडकून पडलेल्या नागरिकांना ड्रोनद्वारे अन्न व पाणी पुरविण्यात आले आहे.
सीना नदीतून तब्बल दोन क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे. सोलापूर जिल्हा आणि मोहोळचे प्रशासन महापुराच्या स्थितीवर लक्ष ठेवून हेाते. मोहोळचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे हे या ठिकाणी उपस्थित असून मोहोळ पोलिस प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला या ठिकाणी प्राचारण केले आहे. सीना नदीचे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील लांबोटी पुलाला लागले आहे.
पुलाच्या आडव्या खांबास पाणी लागल्यानंतर त्याचा दाब पर्यायाने संपूर्ण पुलावर येऊन संपूर्ण पुलास मोठा धोका पोहोचू शकतो, त्यामुळे पाणी लागल्यानंतर वाहतूक बंद ठेवणे क्रमप्राप्त ठरले आहे. पोलिस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊनच त्यानंतर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनाने दुपारी तीनच्या सुमारास दक्षतेचा उपाय म्हणून लांबोटी पुलावरील एका बाजूची वाहतूक बंद केली आहे. दोन्ही बाजूची वाहतूक आता एकाच पुलावरून होत आहे. प्रशासाने दक्षतेचा उपाय म्हणून पुलावर जेसीबी, रुग्णवाहिका आणि होमगार्ड तैनात केले आहेत.
दरम्यान, सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर-विजयपूर महामार्गावरील वडकबाळ येथील पुलाच्या जवळ पाणी पोचले आहे. सीना नदीतून विसर्ग वाढला तर वडकबाळच्या पुलालाही पाणी लागू शकते. या पुलालगतच्या विजयपूर महामार्गावर दोन्ही बाजूला पाणी आले आहे, त्यामुळे या पुलावरही पाणी आल्यास वाहतूक बंद होऊ शकते.
चौकट-
सिना कोळेगाव धारणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असल्याने तसेच सिना निमगाव मधून खूप मोठ्या प्रमाणात डिस्चाज सिना कोळेगाव धरणातून आज दिनांक दि :- 23/09/2025 रोजी एकूण 72000 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग आज रात्री 8:15 वाजता कमी करून 69500 क्युसेक एवढा करण्यात आला आहे.
सिना नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकरी, नागरिक या सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ/कमी होण्याची शक्यता आहे.
... कार्यकारी अभियंता
सिना कोळेगाव प्रकल्प विभाग
परंडा
चौकट-
२३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या विसर्गामध्ये वाढ करुन ७८३७ क्यूसेक्स इतका करण्यात येणार आहे.
निरा नदीच्या दोन्ही तिरावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ/कमी होण्याची शक्यता आहे.
... कार्यकारी अभियंता
निरा उजवा कालवा विभाग फलटण.
चौकट-
सोलापूर रेल्वे विभागातील सीना नदीवरील दोन रेल्वे पूल ओलांड्यांमध्ये पाण्याची पातळी धोक्याच्या सीमारेषेवर पोहोचली आहे. प्राप्त व्हिडीओमध्ये पुढील रेल्वे वाहतुकीसाठी सुरक्षित अंतर अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे गाड्यांचा वेग ३० किमी प्रतितास इतका कमी करण्यात आलेला आहे. याशिवाय मार्गातील अनेक स्थानकांपर्यंत रस्तामार्गाने पोहोचणे सध्या शक्य नाही.
कृपया वरून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे नियमन करता येईल का याची शक्यता तपासावी. कारण दौंड-वाडी हा मार्ग राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कमधील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.
— वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी, सोलापूर विभाग, मध्य रेल्वे.
चौकट-
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली.
आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. यापैकी १८२९ कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले असून येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होईल. तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
चौकट-
सीना नदीच्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यात NDRF व लष्कर पथकांची नियुक्ती
- जिल्हाधिकारी आशीर्वाद
आर्मीच्या हेलिकॉप्टरने दारफळ ता. माढा येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बचाव कार्य सुरू, जवळपास दहा नागरिकांची सुटका झाली असून अन्य नागरिक ही लवकरच सुखरूप बाहेर काढले जातील. भारतीय हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी व मंद्रुप (दक्षिण सोलापूर) तालुक्यांमध्ये पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी तातडीने शोध व बचाव कार्यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे.
0 Comments