Hot Posts

6/recent/ticker-posts

जीवनाच्या शाळेत मात्र आम्ही उच्चशिक्षितच !

 जीवनाच्या शाळेत मात्र आम्ही उच्चशिक्षितच !





आज उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली. खरंतर शिकण्याला वय नसते असाच आजचा अनुभव!
     मध्येच शाळा सोडलेले, कधीही शाळेत न गेलेले व्यक्ती यांची अक्षर ओळख राहूनच गेली.त्यांना आधी निरक्षर आणि आता असाक्षर म्हणून ओळखले जात आहे. आज ते अक्षराचे जरी असाक्षर असले तरी आयुष्याच्या शाळेत मात्र हे सर्वजण उच्चशिक्षित आहेत.
       आज आमच्यापुढे बसलेले बहुतांश पन्नाशी साठी नंतरचे आणि जवळपास 80-90 वर्षापर्यंत वय असलेले व्यक्ती होते.काहींच्या हाताला सुरकुत्या पडलेल्या, केस पिकलेले, काहींच्या डोळ्यावर भिंगाचे चष्मे, काहीजण काठी घेऊन चालत होते तर काहीजण विचारमग्न होते. स्त्रिया छान नऊवारी लुगडं घालून अंगभर पदर घेऊन आल्या होत्या. आणि आजोबा/काका डोक्यावर पांढरी टोपी, धोतर, सदरा घालून आले होते.
  एक आजी म्हणाली,
   "गुरजी जरा लवकर आटपा बरं आम्हांल जायाचं हाय."
 "आजी आता कुठं जाता?" मी म्हटलं.
 आजी म्हणाल्या, "गुरजी आम्हालं निंदायला जायचं हाये. बाया पुढ गेल्या आमच्या."
 मी पुन्हा म्हणालो, "बाप्पा एवढं हित!! म्हातारपणी एवढं हित कशाला करता?"
यानंतरच्या वाक्याने मला माझ्या करत असलेल्या कामाला सुद्धा बळ मिळाले. 
  आजी म्हणाली," बापा गुरजी कामानं माणूस काय मरते का?होतंय तव्हरक करावं." 
    वरील वाक्य प्रचंड प्रेरणादायी होतं.हातापायात पाहिजे तसा जोर नाही, डोळ्याने नीट दिसत नाही परंतु मनात प्रचंड ऊर्जा घेऊन ही पिढी जगत आहे. या पिढीला ना कधी सध्याच्या लोकांसारखं फ्रस्ट्रेशन आलं ना कधी स्ट्रेस आला! कारण यांची स्वतःच्या मनगटावर, कर्मावर आणि ईश्वरावर सुद्धा प्रचंड श्रद्धा आहे.सोबतच आयुष्याकडून मोजक्या अपेक्षा, कुणाचाही द्वेष मत्सर न करणे, कुणावर न जळणे आणि आपलेपण जपणे अशा अनेक गोष्टी असल्याने कधी ताण आला नाही. हीच लोकं पिढी, संस्कृती आणि गावपण जपणारी आहेत. 
     या पिढीने असंख्य आव्हाने पेलून जीवन जगले. संसारातील प्रचंड अडचणीला तोंड देऊन लेकरांचे लाड, शिक्षण, आजारपण असे कर्तव्य केले. यांचे केस पिकले ते त्यांच्या केलेल्या संघर्षाने,अनुभवाने आणि त्यागाने.या पिढीने अनेक सुख आणि मौजेचा त्याग करून आपल्या लेकराबाळाला सांभाळून त्यांना घडवलं आणि मढवलं! कधी एक वेळ न जेवता तर कधी उपाशी राहून, लाल ज्वारी, लाल गहू खाऊन पोटं भरली पण आपली संस्कृती आणि संसार टिकवून ठेवले.आजही या स्त्रिया म्हातारपण आलेलं असूनही त्यांच्या नजरेत एक प्रकारचे उच्च दर्जाचे लाजणे आहे. गुरजी म्हटला की त्यांच्या नजरा आपोआप लाजतात किंवा आदराने झुकतात. आजही या पिढीने अक्षराचे शिक्षण घेतले नसले तरी गुरजी (गुरुजी) बद्दल आदर आणि आस्था कमालीची आहे.
     आज असं वाटत होतं की परीक्षा लवकर संपूच नये. कारण काही आज्या आणि काकू छान त्यांच्या वेळेच्या छान छान गोष्टी सांगत होत्या. एक आजी म्हणाली,
    " गुरजी माही ही नात मला लै जीव लावते बरं." 
मी म्हटलं, "आजी, आम्ही मुलांना नेहमी सांगतो की, आपल्या आजी आजोबांसोबत दहा मिनिट गप्पा मारत जा."
  आजी म्हणाली, "मही नात खूप गप्पा मारते मह्यासंग." आजीचं हे वाक्य ऐकून खूप बरं वाटलं.
    एक आजी तर चक्क व्हरांड्याच्या खाली चप्पल काढून ठेवली.
  आजी म्हणाली,
   "नाही बापा वर नेली तर तुम्ही बोलसाल." एवढा आदर म्हणा किंवा त्यांच्या बालवयातील शाळेचा धाक आजही त्यांच्या मनात जाणवला. म्हणून असं वाटते की आनंददायी शिक्षण किती आवश्यक होतं.
     या पिढीतील अक्षराने असाक्षर परंतु जीवनाच्या शाळेत प्रचंड हुशार आणि अनुभवी व्यक्तींना भेटून खरंच एक प्रकारचे बळ मिळाले. परिस्थिती कशीही असो जगणं आणि लढणं सोडायचं नाही ही शिकवण आज या निमित्ताने मिळाली.

Reactions

Post a Comment

0 Comments