Hot Posts

6/recent/ticker-posts

करजगी तलाव वगळता सर्व तलाव तुडुंब '; लघू पाटबंधारे विभागांतर्गत आहेत १० साठवण तर ९५ पाझर तलाव

 करजगी तलाव वगळता सर्व तलाव तुडुंब '; लघू पाटबंधारे विभागांतर्गत आहेत १० साठवण तर ९५ पाझर तलाव    

  



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अक्कलकोट शहर व तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने तालुक्यातील नदी, नाले, ओढे व तलाव भरून वाहत आहेत. तसेच बोरी मध्यम प्रकल्प म्हणजे कुरनूर धरण सुद्धा गेल्या महिनाभरापासून तुडुंब भरून जादा पाणी खाली सोडण्यात येत आहे.   अक्कलकोट तालुक्यातील एखादा अपवाद सोडला तर सर्व तलाव, पाझर तलाव तुडुंब भरले आहेत.

अक्कलकोट तालुक्यात लघू पाटबंधारे विभागांतर्गत १० तलाव येतात. त्यामधील नऊ तलाव तुडुंब भरून वाहू लागले तर करजगी येथील एक तलाव कोरडा आहे. यापैकी एकही तलाव फुटलेला नाही. बोरगाव दे. तलावाजवळील सांडव्याखाली पाणी जाण्याचा मार्ग पूर्ण तुटलेला आहे. त्यामुळे तलावाकडे जाता येत नाही. तसेच घोळसगाव साठवण तलावाच्या सांडव्याखालील गाइडबंड खचून वाहून गेलेला आहे.

मृदा व जलसंधारण विभागांतर्गत एक ल. पा. तलाव, साठवण तलाव १०, पाझर तलाव ९५ आहेत. तालुक्यात पडलेल्या दमदार पावसामुळे हे सर्व पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. तसेच अक्कलकोट शहरातील बायपास मार्गावरील राम तलाव व हत्ती तलाव हे दोन मोठे तलाव असून, पावसामुळे हे दोन्ही तलाव तुडुंब भरलेले आहेत. हत्ती तलावाला दोन सांडवे असल्याने पाण्याने तुडुंब भरल्यानंतर जादा झालेले पाणी सांडव्यातून वाहून पुढे जाते.  परंतु, राम तलावाला मात्र सांडवा नसल्याने थडगे मळ्यातील डोंगराला टेकून हा तलाव तुडुंब भरला आहे. हा तलाव केव्हाही फुटण्याच्या मार्गावर असल्या कारणाने त्याला रविवारी एका बाजूने सांडव्यासारखी वाट करून खालील बाजूस पाणी सोडण्यात आलेले आहे, त्यामुळे हा तलाव फुटण्याचा धोका टळला आहे. वाढलेले बहुतांश पाणी खाली जात असताना ते थडगे मळा येथील परिसरात पसरल्याने त्या ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे.

तालुक्यातील तलावांची स्थिती

१) भुरीकवठे १०० टक्के, २) बोरगाव १०० टक्के, ३) हंजगी १०० टक्के, ४) डोंबरजवळगे १०० टक्के, ५) काझीकणबस १०० टक्के, ६)शिरवळवाडी १०० टक्के, ७) सातनदुधनी १०० टक्के, ८) गळोरगी १०० टक्के, ९) घोळसगाव १०० टक्के, १०) करजगी तलाव : कोरडा आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments