धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन;
फडणवीसांनी शब्द पाळावा अन्यथा उद्रेक अनिवार्य : आ. जानकर
माळशिरस (कटूसत्य वृत्त) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर राज्यभरात तीव्र उद्रेक होईल, असा इशारा आमदार उत्तमराव जानकर यांनी दिला.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी माळशिरस तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार जानकर बोलत होते. त्यांनी सांगितले की, "२०१४ मध्ये या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाची ठिणगी माळशिरस येथून पेटली होती. आता पुन्हा ही ठिणगी भडकणार असून ‘आरपार’ची लढाई लढावी लागेल."
या आंदोलनात पांडुरंग वाघमोडे, डॉ. मारुती पाटील, गौतम माने, तुकाराम देशमुख, अॅड. सोमनाथ वाघमोडे, सुरेश टेळे, माऊली पाटील, गणपतराव वाघमोडे, विष्णू नारनवर, मधुकर पाटील, तुकाराम ठवरे, संजय जगताप, विकास बंडगर, शिवाजीराव सिद यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
धरणे आंदोलनाचे निवेदन तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी स्वीकारले. या आंदोलनादरम्यान समाज बांधवांनी शासनाविरोधात जोरदार घोषणा देत, आरक्षणासाठी ‘आरपार’च्या लढाईला सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
0 Comments