सदाभाऊ, आम्ही दिलेले पैसे तरी परत द्या!
तोंड चाटक्या पुढार्यांसह खोत पळून गेले
माढा (कटूसत्य वृत्त):-अतिवृष्टी आणि महापुरामुळे उंदरगावात झालेले प्रचंड नुकसान पाहण्यासाठी माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत गावात पोहोचले. मात्र गावकऱ्यांचा संताप एवढा तीव्र होता की खोतांना हात जोडून मागे फिरून सोबत आणलेल्या तोंड चाटक्या पुढार्यांसह पळून जावे लागले.ग्रामस्थांनी थेट सवाल केला – "आठ दिवस कुठं होता? नुसते फोटो काढायला आलात का?" काहींनी तर 2009 च्या निवडणुकीत वर्गणी म्हणून दिलेले पैसे परत द्या, अशी मागणी केली.
शेतकरी म्हणाले की, आम्ही वर्गणी काढून तुम्हाला मदत केली, लीड दिला. पण तब्बल 16 वर्षांनीच तुम्ही गावात आलात. आमचं आयुष्य पूरग्रस्त झालं, जनावरं रस्त्यावर आली, घरं चिखलानं भरली. तरीही आमच्यासाठी मदत नाही. फक्त रस्त्यावर उभं राहून पाहणी करून काय उपयोग?
एका ज्येष्ठ शेतकऱ्याने उपरोधाने हात जोडून विनंती केली – "सदाभाऊ आमच्यावर उपकार करा, निदान आम्ही निवडणुकीला दिलेले पैसे तरी परत द्या." दुसऱ्या शेतकऱ्याने फटकारलं, "प्रहार संघटनेनं आमच्यासाठी काहीच केलं नाही. आम्हाला तुमचं काहीच नको, माघारी जा."
शेतकरी अधिक आक्रमक होत म्हणाले, "त्या वेळी २५ हजारांची वर्गणी देऊन पाचशेच्या माळा घातल्या होत्या. प्रेम दिलं, लीड दिला. आणि आता १६ वर्षांनी आलात, काय कामाचं? जनावरं रस्त्यावर बांधली आहेत, चारा मिळत नाही. खासदार थोडाफार चारा देतात, पण प्रशासन टोलवाटोलवी करतं."
सदाभाऊ खोत यांनी ग्रामस्थांचा आक्रोश ऐकून शेवटी हात जोडले आणि म्हणाले, "जर तुम्ही म्हणता तर जातो माघारी." आणि खरोखरच गावकऱ्यांचा संताप पाहून त्यांनी काढता पाय घेतला.यावरून हे स्पष्ट होते की, शेतकऱ्यांचा आक्रोश हा केवळ मदतीसाठी नाही, तर वर्षानुवर्षे विसरल्या गेलेल्या वचनांचा हिशोब मागण्याचा आहे.

0 Comments