चंद्रभागेतील विष्णुपद मंदिराचं अस्तित्व धोक्यात, निकृष्ट दर्जाचे कामामुळे पहिल्याच पुरात छतावरील प्लास्टर वाहुन गेले, पंढरपुरातील समाजसेवक गणेश अंकुशराव यांचे गंभीर आरोप
पंंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात असलेले विष्णुपद या मंदिराचे संवर्धनाचे मंदिर समिती मार्फत झालेले काम हे संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले असल्यामुळे नुकत्याच येऊन गेलेल्या पुरात या मंदिराचे छतावर केलेले प्लास्टर वाहून गेले असुन या पुरातन मंदिराचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. असा गंभीर आरोप येथील समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी केला आहे.
मंदिर समिती च्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभारासंदर्भातील अनेक गोष्टी याआधीही गणेश अंकुशराव यांनी चव्हाट्यावर आणुन आवाज उठवला होता, प्रामुख्याने मंदिराच्या छताला गळती, गोशाळेतील व्यवस्थापनातील त्रुटी, मंदिरातील अस्वच्छता आदींसह विविध मुद्द्यांवर त्यांनी लक्ष वेधले होते.
नुकत्याच येऊन गेलेल्या चंद्रभागेच्या पुरात नदीपात्रातील अनेक मंदिर पाण्याखाली गेली होती. त्यामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग जेंव्हा पंढरपुरात गायी गोपाळांसह सर्वप्रथम ज्या ठिकाणी आले ते विष्णूपद मंदिरही पाण्याखाली गेले होते. पाणी ओसरल्यावर गणेश अंकुशराव या मंदिराच्या छतावर गेले आणि पाहणी केली असता छतावरचे प्लास्टर वाहुन गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
अतिशय पुरातन असलेलं हे संपुर्ण मंदिर दगडाचं आहे. परंतु मंदिर समितीनं जतन संवर्धन करण्याचे काम करताना आधुनिक वजड यंत्र , मशिनरीज याचा वापर केल्यामुळे व कंत्राटदाराने बोगस निकृष्ट काम केल्यामुळे मंदिरावरच्या स्लॅबची आणि चिरेबंदी तटबंदीची पहिल्याच पुरात दुरावस्था झाली आहे. याकडे वेळीच लक्ष देऊन तातडीने चांगली डागडुजी केली नाही तर या मंदिराच्या अस्तित्वालाच भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी याकडे तातडीने लक्ष घालून बेजबाबदार मंदिर समिती प्रशासन व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू! असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
0 Comments