कुर्डुवाडीत घरफोडी' १० तोळ्यांचे दागिने, २५ हजारांची रोकड लंपास
कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहणाऱ्या दोन भावांच्या बंद घरातून भरदिवसा चोरट्यांनी सुमारे दहा तोळे वजनाचे दागिने, चांदीच्या वस्तू व रोख २५ हजार रुपये चोरून नेले. ही घटना शनिवारी (ता.२०) दुपारी साडेतीन ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.
रवींद्र भांबुरे व वीरेंद्र भांबुरे (दोघे रा. कुर्डुवाडी) यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन्ही भावांची घरे शेजारी असून घरासाठी एक दरवाजा आहे. रवींद्र भांबुरे हे कुटुंबीयांसह दवाखान्यासाठी पुणे येथे गेले होते. वीरेंद्र भांबुरे यांचे काही अंतरावर टेलरिंगचे दुकान आहे. ते दुकानातून ३ वाजता घरी येऊन जेवण करून कुलूप लावून गेले.
सहा वाजता भांबुरे यांनी घरी येऊन कुलूप उघडले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. फिर्यादीच्या जिन्याचा दरवाजा भिजला असल्याने उघडा राहत होता. या दरम्यान चोरट्यांनी जिन्याच्या दरवाजातून प्रवेश केला. दोन्ही भावांच्या घरातील चोरी केली. यामध्ये वीरेंद्र भांबुरे यांच्या घरातील साडे तीन तोळ्याचे गंठण व ५० ग्रॅम चांदीचा कंबरपट्टा चोरीस गेला.
रवींद्र यांच्या घरातील सुमारे साडे सहा तोळ्याचे गंठण, नेकलेस, अंगठ्या व कानातील सोन्याचा ऐवज, चांदीचे चार ब्रासलेट, दोन पैंजण जोड, हार व रोख पंचवीस हजार रुपये असा दोन्ही मिळून सुमारे १ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी पाहिले. श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. श्वानपथक रस्त्यावरच घुटमळले. अधिक तपास पोलिस करत आहेत.
0 Comments