मराठा आंदोलकांसाठी बार्शी तालुक्यातून मदतीचा ओघ
बार्शी / (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे मराठा बांधवांसह मुंबई येथील आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. संपूर्ण
महाराष्ट्रातून मुंबईत एकवटलेल्या मराठा बांधवांना आंदोलनाच्या पहिल्या दोन दिवसात पिण्याचे पाणी, जेवण व झोपण्याची गैरसोय झाली.
सरकारकडून विशेषता मुंबई महापालिकेकडून कोणतीही सुविधा नसल्याने आंदोलनकर्त्यांचे हाल झाले. या बातम्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्यानंतर बार्शी तालुक्यातील सकल मराठा समाजाचे तरुण अॅड. हर्षवर्धन पाटील, निलेश पवार, शिरीष जाधव, तुळशीदास मस्के यांनी मराठा आंदोलकांना अन्नधान्य पाठविण्याचे सोशल मीडियावर आवाहन केले व बैठक घेऊन नियोजन केले. यानंतर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बार्शी तालुक्यात अनेक गावांमधून व अनेक मराठा बांधवांनी जेवणासाठी भाकरी, चटणी, ठेचा व डाळी, तेल, तांदूळ, गहू आदींच्या रूपात मदत करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर बार्शी तालुक्यातून अनेक गावांमधून मुंबईला अन्नधान्य पाठविण्याची तयारी सुरू झाली. केवळ मराठाच नाही तर इतर समाजाच्या बांधवांनीही सहकार्य करण्याचे जाहीर केले.
बार्शी तालुकातून आतापर्यंत साधारणता २५ पेक्षा जास्त गावांमधून जेवण पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे. त्यापैकी आता काही गावांचे पार्सल छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचलेलं आहे. काही गावच्या गाड्या मुंबईच्या जवळपास आलेल्या आहेत व काही गावच्या गाड्या सकाळी निघत आहेत.
चौकट
बार्शीचे आमदार दिलीप सोपल जरांगे यांच्या भेटीला
मुंबई येथे आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनावेळी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आंदोलनकर्त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांना ठाम पाठिंबा दर्शवला. या भेटीपूर्वी आमदार दिलीप सोपल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती
केली आहे. मराठा समाजाला सामाजिक न्याय व समान हक्कासाठी आरक्षणाची गरज असून सामाजिक, शैक्षणिक भवितव्याचा हा प्रश्न असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. मराठा आरक्षणाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
0 Comments