अकलूजच्या घोडे बाजारात विक्रीसाठी घोडे दाखल
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूजच्या घोडे बाजारात विक्रीसाठी घोडे दाखल होऊ लागले असून,ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच अकलूजच्या घोडे बाजारात परप्रांतीय घोडे व्यापारी आपले घोडे घेऊन दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
दिवाळी पाडव्याला अकलूज घोडे बाजाराचे उदघाटन करण्यात येते. परंतु अकलूजचा घोडे बाजार प्रसिद्ध असल्या कारणाने जागा पकडण्यासाठी, गर्दी होण्या अगोदरच विक्रीचा फायदा घेण्यासाठी व्यापाऱ्यामध्ये चढाओढ लागलेली आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे विक्री चांगली होईल अशी व्यापाऱ्यांना आशा आहे. त्यामुळे एक महिना अगोदरच सुमारे 95 घोडे अकलूज बाजारात आले आहेत. त्यातील 24 घोड्यांची विक्री होऊन सुमारे 25 लाख रुपयांची उलाढालही झाली आहे. सप्टेंबर महिन्या अखेर सुमारे 800 ते 900 घोडे दाखल होतील. ऑक्टोबर च्या सुरुवाती पासून खऱ्या अर्थाने घोडे बाजार फुलू लागेल. कर्नाटक, आंध्रप्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या भागातून व्यापारी येतील. सुमारे दोन ते अडीच हजार घोडे बाजारात येऊन कमीत कमी 4 ते 5 कोटींची उलाढाल होईल अशी माहिती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी माहिती दिली.
आपले जातीवंत 30 घोडे घेऊन बाजारात आलेले बरेली, उत्तर प्रदेशाचे व्यापारी आसिफ म्हणाले, भारतात प्रामुख्याने पंजाबी, सिंधी, मारवाडी, काटियावाडी घोड्यांना चांगली मागणी असते. पंजाबी घोडे वरातीसाठी, थोर्गब्रीड व सिंधी घोडे स्पर्धेसाठी आणी विविध खेळांसाठी, मारवाडी घोडे ब्रिडींग साठी आणी आवड (शौक) म्हणून पाळले जातात. तर थोर्गब्रीड आणी सिंधी घोडे प्रवासासाठी वापरले जातात.
आम्ही सहा महिने उत्तर प्रदेशातून व्यापार करतो. या काळात पंजाब व हरियाणा राज्यातून जातीवंत घोडे खरेदी करतो. त्यानंतर महाराष्ट्रातील अकलूज, सरांगखेडा, मालेगाव, इंदापूर व शिरपूर या बाजारात जाऊन विक्री करतो. 15 घोड्यांची एक खेप यूपी तुन अकलूजला आणण्यासाठी आम्हाला सुमारे 1 लाख रुपये ट्रान्सपोर्टचा खर्च येतो. या घोड्यांच्या देखभालीसाठी, त्यांना फिरवण्यासाठी व नाच शिकवण्यासाठी आम्हाला कामगार ठेवावे लागतात.
अकलूजच्या बाजारात व्यापाऱ्यांची फसवणूक होत नाही. घोड्यांसाठी योग्य निवारा, चारा, पाणी, जनावरांचे डॉक्टर येथे उपलब्ध असतात. कॉम्पुटरराईजड खरेदी विक्रीची पावती केली जाते. त्यामुळे आम्ही अकलूज बाजारात एक महिना अगोदरच माल घेऊन येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
0 Comments