करकंबमधून २५ हजार लाडू, चिवड्याची पाकिटे
करकंब :(कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मुंबई
येथील आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनात लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले आहेत. त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी पंढरपूर तालुक्यातील करकंब येथीलमराठा समाज बांधवांसह बहुजन समाजाच्या वतीने लाडू व चिवड्याची २५ हजार पाकिटे पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये राज्यभरातील लाखो मराठा समाज बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. परंतु आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शासनाने आडमुठेपणाची
भूमिका घेऊन आझाद मैदान परिसरातील हॉटेल व खाऊ गल्ली बंद केल्यामुळे शासनाची क्रूरता समोर आली आहे. तसेच आझाद मैदान परिसरातील पाणी व लाईटची व्यवस्था देखील बंद करण्यात आली होती. आंदोलनात सहभागी असलेल्या समाज बांधवांची जेवणाची गैरसोय होऊ नये, यासाठी करकंब येथून रविवार ३१ ऑगस्ट पर्यंत चिरमुरे ७ क्विंटल, शेंगदाणे १ क्विंटल, शेव २ क्विंटल, फरसाणा ५० किलो, दाळे ५० किलो, तेल डब्बे ३५, साखर ४ क्विंटल, बेसन पीठ ५ क्विंटल, पाणी बॉटल २००
बॉक्स आदी साहित्य देण्यात आले आहे. अद्यापही साहित्य देण्याचा ओघ सुरू असून चिवडा व लाडू बनविण्याचे काम येथील कनकंबा मंदिरात सुरू आहे. लाडू व चिवडा पाकिटे घेऊन जाणारे वाहन सोमवारी मुंबईच्या दिशेने रवाना आले आहे.
0 Comments