पाणी वापर संस्थांची नोंदणी करणे काळाची गरज - आ.मोहिते पाटील
अकलूज:(कटूसत्य वृत्त):-
डिसेंबर अखेरपर्यंत उजनीतील सव्वादोन टीएमसी पाणी घाटणे बंधार्यात जाणार आहे .पुढील वर्षी पर्यंत उजनीतील आणखी सात टीएमसी पाणी मराठवाड्यात जाणार आहे .त्याशिवाय बंदिस्त जलवाहिनी झाल्याने सोलापूरला पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भिमेला सोडण्यात येणारे सात टीएमसी पाणी भीमेतून येणे बंद होणार आहे .उजनीतील पाण्याचा हा तुटवडा वरचेवर वाढत जाणार असल्याने उजनीचे पाणी आरक्षित करण्यासाठी पाणी वापर संस्थांची नोंदणी करणे काळाची गरज असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी शेतकऱ्यांना विनंतीवजा बजावून सांगितले .माळशिरस व माढा तालुक्यातील भिमेकाठच्या पंधरा गावांची बैठक आमदार रणजितसिंह यांनी गणेशगाव येथे आज (रविवार ) घेतली .
या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील शिवतेजसिंह मोहिते पाटील , विश्वतेजसिंह मोहिते - पाटील ,भीमा पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे ,उप अभियंता कल्याणराव देशमुख व इतर अधिकारी आणि हजारो शेतकरी उपस्थित होते .त्याआधी गणेशगाव येथील नव्याने बांधण्यात येणाऱ्या ३३ / ११ के .व्ही . च्या वीज उपकेंद्राचे भूमिपूजन आमदार मोहिते - पाटील यांच्या हस्ते झाले .यावेळी विठ्ठल नलावडे , सरपंच रेहाना नजीर शेख , उपसरपंच बाळासाहेब ठोकळे , कुंडलिक शेंडगे ,कार्यकारी अभियंता संजीव राठोड आदी उपस्थित होते .
मला पाण्याचे राजकारण करायचे नाही म्हणून भर पावसाळ्यात आज ही बैठक आयोजित केली आहे .उजनी धरणावरील पाण्याचा ताण वाढत चालला आहे . आपण वेळीच जागे झालो नाही तर भविष्यात मोठे जल संकट येणार आहे . त्यासाठी भीमेच्या दोन्ही काठावरील गावांनी आपापल्या स्तरावर पाणी वापर संस्था निर्माण करण्याची गरज आहे , असे केले तरच आपले पाणी आरक्षित राहणार आहे अन्यथा ते इतरत्र वापरले जाईल असा इशारा देखील आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी दिला .पुढील आठवड्यात या संदर्भात पंढरपूर येथे देखील बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे .
चौकट :
नुकत्याच येऊन गेलेल्या पुरात भीमा व निरेतून १४२ टीएमसी पाणी वाहून गेले आहे यावरून स्थिरीकरण योजनेचे महत्त्व अधोरेखित होते . सोलापूरला पिण्यासाठी एक टीएमसी पाणी जलवाहिनीतून जात होते आता त्याचा विस्तार केल्याने सोलापूरला सव्वादोन टीएमसी पाणी जाणार आहे .बंदिस्त जलवाहिनीद्वारे सोलापूरला पाणी जाणार असल्याने नदीद्वारे सोलापूरला पिण्यासाठी सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे .उजनी वरील पिण्याच्या पाण्यासाठी असणाऱ्या योजनांना नऊ टीएमसी पाणी लागते त्यासाठी प्रत्यक्षात १७ टीएमसी पाणी सोडावे लागते . आता यातही सात टीएमसी ची घट होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांचा भविष्यकाळ वाईट असल्याचे आमदार रणजितसिंह यांनी समजावले .
चौकट : -
उजनी हा प्रकल्प बारमाही नसून आठमाही आहे . येथे खरीप व रब्बी हंगामासाठीच पाण्याची तरतूद आहे उन्हाळ्यासाठी नाही असे कार्यकारी अभियंता हरसुरे यांनी सांगितले .पाणी वाटप संस्था झाल्यानंतर त्या पाणी वाटप संस्थेचे हक्काचे पाणी ती संस्था कोठेही साठवून त्याचा उन्हाळ्यात उपयोग करू शकते .कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांवर ३०० ते १ हजार हेक्टर पर्यंत क्षेत्र सिंचित होईल एवढ्या क्षमतेच्या पाणी वाटप संस्था नदीच्या दोन्ही तीरावर स्थापन करण्यात येतील.
0 Comments