महाबँक कर्मचारी संघटनेचा "डॉ.श्रीपाद अमृत डांगे स्मृती पुरस्कार" कॉ.मिलिंद रानडे यांना जाहीर
छ. संभाजी नगर (कटूसत्य वृत्त):- बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन,औरंगाबाद या ए.आय.बी. इ.ए.(AIBEA) संघटनेच्या वतीने कामगार चळवळीत अमूल्य योगदान दिलेल्या व्यक्तीस कामगार चळवळीचे अर्धव्यू कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांचे स्मरणार्थ 1999 सालापासून पुरस्कार दिला जातो.
या वर्षी छ. संभाजी नगर येथे संघटनेच्या संपन्न होत असलेल्या संघटनेच्या अधिवेशनात या पुरस्कारासाठी निवड समितीने मुंबई कचरा वाहतूक या अत्यंत दुर्लक्षित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रदीर्घ कायदेशीर न्यायालयीन संघर्ष करून त्यांना सेवेत कायम करण्यात यशस्वी झाले अशा कॉ.मिलिंद रानडे यांची निवड केल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष कॉ.देविदास तुळजापूरकर आणि जनरल सेक्रेटरी कॉ.धनंजय कुलकर्णी यांनी केली.
कचरा वाहतूक गाडीवरच घ्यावे लागणारे जेवण, प्रत्येक फेरीवरच ठरलेली मिळकत, पिण्यासाठी सुद्धा पाण्याची सोय नाही,कामाच्या ठिकाणी गमबुट किंवा हातमोजे पुरवठा नसल्याने निर्माण होणारे त्वचा आणि श्वसनाशी होणारे घातक दुर्धर आजार,कामाहून परतीच्या वेळी कपडे आणि शरीर यामुळे होणारी दुर्गंधी म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास नाही अशा यम यातना मधून जगावे लागणारे जीवन अशा कामगारांशी संवाद साधून,महत्प्रयासातून त्यांची संघटना बांधणे आणि तो सर्वोच्च न्यायालया पर्यंत वीस वर्षाहून चिवटपणे लढण्याचे कार्य कॉ. रानडे यांनी केले आहे.
बँक कर्मचारी संघटनेने या पुरस्काराची पार्श्वभूमी विषद करताना कॉ. तुळजापूरकर आणि कॉ. धनंजय कुलकर्णी म्हणाले की,समाजातील विविध क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान अनेक ठिकाणी केले जातात परंतु कामगार क्षेत्रात आयुष्यभर काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची दखल सहसा घेतली जात नाही. यामुळेच आमच्या बँक कर्मचारी संघटनेने असा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे ठरविले.
आजवर कॉ.चिटणीस, कॉ. उल्का महाजन, कॉ....... कॉ.सुरेश धोपेश्वरकर
अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
या वर्षी संघटना अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात दि.13 सप्टेंबर रोजी हा पुरस्कार कॉ.रानडे यांना प्रदान करण्यात येईल. रोख रु 50,000/- आणि स्मृति चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल ,हे ही त्यांनी स्पष्ट केले.
0 Comments