Hot Posts

6/recent/ticker-posts

सीना नदीच्या पुरामुळे भीषण संकट; शेतकरी, व्यावसायिक, कारागीर सर्वांवर परिणाम : खासदार धैर्यशील मोहिते पाटील

 सीना नदीच्या पुरामुळे भीषण संकट; शेतकरी, व्यावसायिक, कारागीर सर्वांवर परिणाम : खासदार धैर्यशील मोहिते पाटील

माढा (कटूसत्य वृत्त) :- सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा व करमाळा तालुक्यातील सीना काठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या आपत्तीत केवळ पिकांचेच नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर जनावरे दगावली आहेत. या अभूतपूर्व संकटाचा फटका शेतकरी वर्गासह गावातील लहानमोठे व्यावसायिक, कारागीर, शेतमजूर आणि समाजातील सर्वच स्तरांतील घटकांना बसला आहे. यातून सावरण्यास एक-दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे, असे मत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

आज त्यांनी माढा तालुक्यातील शिंगेवाडी, नाडी, बारलोणी, मुंगशी व तांदुळवाडी या पूरग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला पंचनामे करण्याच्या तातडीच्या सूचना दिल्या. “कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार मोहिते पाटील म्हणाले की, “गावांमध्ये इंधन व अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक गतिमान करून तातडीने पुरवठा व्हावा. रोगराईचा धोका लक्षात घेऊन आरोग्य सुविधा त्वरित उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना केल्या पाहिजेत.”

पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही खासदार मोहिते पाटील यांनी दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments