Hot Posts

6/recent/ticker-posts

२ लाख शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गेला, १५६ जनावरं दगावली; अतिवृष्टीमुळे ८ जणांचा मृत्यू

 २ लाख शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गेला, १५६ जनावरं दगावली; अतिवृष्टीमुळे ८ जणांचा मृत्यू





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसानं अशरक्ष: झोडपलं. यामुळे जनजीवन तर विस्कळीत झालीच, शिवाय पिके पाण्याखाली गेली.
तसेच जनावरं वाहून गेली. शेतकऱ्यांचा तोंडचा घास गेल्यानं काहींनी आत्महत्येचा पर्याय निवडला. काळजाला चिर्र करणारा आक्रोश ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. मात्र, आता हळूहळू महापुराचे पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे. महामार्गावरील वाहतूक देखील सुरळीत होत आहे. जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

सीना नदीला आलेल्या महापुराचे पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून ठप्प झालेली सोलापूर - पुणे आणि सोलापूर - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अखेर सुरळीत झाली आहे. महापुरामुळे मोहोळ तालुक्यातील लांबोटी पूल पाण्याखाली गेला होता. मात्र, पहाटेपासून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील महापूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. नुकसानीची आकडेवारी समोर आली असून, तब्बल २२ लाख २३ हजार ६६१ शेतकऱ्यांच्या एकूण १ लाख ९६ हजार ५६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यात ऊस, केळी, बाजरी, मका, डाळिंब अशा विविध पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतीपिकांव्यतिरिक्त जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. १५६ जनावरे वाहून गेली आहेत. तसेच १८ हजारहून अधिक कोंबड्यांचा बळी गेला आहे. याशिवाय पूर आणि अतिवृष्टीमुळे ८८३ घरांचे पडझड झाली असून, सर्वाधिक फटका माढा, करमाळा, अक्कलकोट, बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्यांना बसला आहे.

या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरग्रस्त भागांना भेट दिली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी तातडीने मदतीची मागणी केली आहे. दरम्यान, आता सरकारकडून किती आणि कधी मदत मिळणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments