साेलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने ३७९ गावांतील १.५४ लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
- माढा तालुक्यातील सिना नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली
- बार्शी तालुक्यात चांदणी नदीला पूर; सोयाबीन पिकाचे नुकसान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार ३७९ गावातील १.५४ लाख शेतकऱ्यांच्या १ लाख ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रत्येक तालुक्यात पंचनामे करण्याचे काम सुरू असून नुकसानीची अंतिम आकडेवारी येण्यास आणखी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.
ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी ५९ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये ५९ हजार ११० शेतकऱ्यांचे ५६ हजार ९६१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. यामध्ये उत्तर सोलापूर २६ कोटी ०३ लाख, दक्षिण सोलापूर ११ कोटी ९९ लाख, अक्कलकोट १४ कोटी ०४ लाख, माढा १ कोटी ५९ लाख, पंढरपूर ४ कोटी ७० लाख, बार्शी ८.१८ लाख, अपर मंद्रूप १३.९९ लाख, मोहोळ १७.७३ लाख, मंगळवेढा १२.५४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नुकसानीची स्थिती
चौकट-
तालुका गावे शेतकरी संख्या क्षेत्र
द.सोलापूर २८ १८५०० १७५००
बार्शी ६२ ५२९२५ ४७४५१
अक्कलकोट ११८ ४३४९२ ४७६००
मोहोळ ३५ २५५०० १५००
माढा ४० ३१५० ७६१०
करमाळा ९६ ११४२५ ७६१०
एकूण ३७९ १५४९९२ १३३६७६
सोयाबीन, तूर, कांद्याचे मोठे नुकसान
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, मका, कांदा, बाजरी व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुकानिहाय महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अंतिम आकडेवारी दोन ते तीन दिवसात येणार असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
'माढा तालुक्यातील सिना नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली'; माढा-वैराग वाहतूक बंद; प्रशासनाकडून पाहणी
माढा तालुक्यातील सीना नदीला महापूर आला असून यामुळे माढा - वैराग अर्थात माढा-तुळजापूर ही वाहतूक ठप्प झाली आहे. परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून ४६००० क्युसेक्सहून अधिक पाण्याचा विसर्ग सीना नदीत सोडल्यामुळे माढा तालुक्यातील सिना नदीकाठच्या सर्व गावांमध्ये पूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे.
माढा तालुक्यातील सिना नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली
बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये दारफळ - जामगाव, निमगाव (माढा) - दारफळ, दारफळ - राहूलनगर, निमगाव - राहूलनगर, मानेगाव - वाकाव, मानेगाव - चव्हाणवाडी या मार्गांचा समावेश आहे. यापुरामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेले आहे. यापूर्वी २००५ व २०२० मधे आलेल्या पुरापेक्षाही यंदाची परिस्थिती अधिक गंभीर आहे.
सध्या कोळेगाव धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी पूर परिस्थिती निवडण्यास वेळ लागणार आहे. सीना नदीला आलेल्या पुराची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कुर्डूवाडी, चोभेपिंपरी, मुंगशी या नदीकाठच्या गावात जाऊन पाहणी केली व प्रशासनाला सूचना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसिलदार संजय भोसले, गटविकास अधिकारी महेश सुळे यांनीही मुंगशी येथील पूरस्थितीची पहाणी केली. मुंगशी (ता. माढा) येथील मोरे वस्ती, दणाणे वस्ती, तांबवे वस्ती येथील सिना नदीच्या पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे तहसीलदार संजय भोसले यांनी सांगितले.
बार्शी तालुक्यात चांदणी नदीला पूर; दुचाकी स्वारास तरुणांनी वाचविले, सोयाबीन पिकाचे नुकसान
बार्शी शहर अन् तालुक्यात मागील तीन दिवसांपासून दिवसा व रात्री मुसळधार पाऊस होत असून नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प होत असून आगळजवळ असणाऱ्या चांदणी नदी दुतढी भरुन वाहत असून पुलावरुन दुचाकीवर एक जण वाहून जात असताना उपस्थित तरुणांनी त्यास वाचवले आहे.
चांदणी नदीला पूर आल्याने आगळगावसह अनेक गावाचा बार्शी तालुक्याचा संपर्क तूटला आहे. बुधवार (ता. १७) रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान चांदणी नदीवरील पुलावरून एक दुचाकीस्वार बार्शीकडे जात असताना अचानक दुचाकी घसरून पूराच्या पाण्यात वाहू लागली.
पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे दुचाकीसह इसम वाहत चालल्याचे दिसताच पुलावर उपस्थित असलेले शुभम गरड, रवि कोल्हे, गोट्या शिंदे व हैदर मुजावर जीवाची पर्वा न करता इसमाला नदीच्या पुरातून सुखरुप बाहेर काढले.
सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील गौडगाव, वैराग, खांडवी, नारी आणि पांगरी मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने हवालदील झालेला शेतकरी आता अतिवृष्टी पावसामुळे सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
सोयाबीन पीक कसेबसे येण्याच्या मार्गावर असतानाच अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास पावसाने हिरवल्यामुळे तालुक्यातील गौडगाव, वैराग, खांडवी, नारी आणि पांगरी मंडळातील शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे.
तहसीलदार यांनी तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
0 Comments