पालकमंत्री गोरे यांच्याकडून करमाळा तालुक्यातील खडकी व बिटरगाव गावांना भेटी व नुकसानीची पाहणी
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात 14 सप्टेंबर रोजी 9 महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. तसेच सीना नदीला पूर येऊन खडकी, निलज, बोरगाव, तरटगाव, बिटरगाव (श्री), वाघाचीवाडी, आळजापुर, बाळेवाडी आदी गावात पुराचे पाणी शिकल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खडकी व बिटरगाव श्री या गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली. तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने त्वरित करून शासनाला अहवाल सादर करावा, असे आदेशही त्यांनी दिले.
यावेळी पालकमंत्री गोरे यांनी खडकी येथे पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने फुटलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून येथील नुकसानग्रस्त शेतकरी लोहार यांच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. बंधाऱ्याचे दरवाजे बंद असल्याने दोन्ही बाजूचा भराव वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे शेती पिके व मातीही खरडून वाहून गेली आहे. यावेळी त्यांनी प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश देऊन शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना धीर दिला. त्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी बिटरगाव श्री येथील नुकसानीची पाहणी केली. बिटरगाव श्री येथील पूर्ण रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याची पाहणी केली. यावेळी अनेक महिलांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती पालकमंत्री महोदय यांना दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता सुनिता पाटील यांच्यासह केदार सावंत, गणेश चिवटे, शशिकांत पवार, जगदीश अग्रवाल, प्रा. रामदास झोळ, सूर्यकांत पाटील, कन्हैयालाल देवी, महेश चिवटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments