कॉरिडॉरला विरोधासाठी साखळी उपोषण करणार
पंढरपूर :   (कटुसत्य वृत्त):-  पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात चौफाळा ते महाद्वार घाटापर्यंत सुमारे ६३० मालमत्ता पाडण्यात येणार आहेत. यास मालमत्ताधारकांचा विरोध होत असून आमची घरे पाडण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा अनावश्यक भाग पाडा, अशी मागणी मालमत्ताधारकांनी केली आहे.
आठवड्यात कॉरिडॉर विरोधी साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा कॉरिडॉर बाधितांनी दिला आहे. त्यामुळे कॉरिडॉरविरोधी लढा तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने संत एकनाथ भवन
येथे कॉरिडॉर बाधितांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेकांनी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही याठिकाणी राहत असून ही जागा आम्ही सोडणार नाही. आवश्यक वाटल्यास शासनाने विठ्ठल मंदिराचा अनावश्यक भाग पाडावा, अशी मागणी केली.
एकंदरीत या बैठकीत अनेक नागरिकांनी कॉरिडॉरला विरोध दर्शवून मालमत्ता पाडण्यास विरोध असल्याचे सांगितले. कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीव्र लढा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
पंढरपूर कॉरिडॉरकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे कॉरिडॉर येणाऱ्या आषाढी यात्रेपर्यंत पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी मालमत्ताधारकांना योग्य मोबदला देण्यासाठी बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र बैठकीमध्ये मालमत्ताधारकांनी कॉरिडॉरला विरोध दर्शविला असल्याचे दिसून येत आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सर्वांचे योग्य समाधान करून कॉरिडॉर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

0 Comments