बंजारा समाजाला एसटी आरक्षण लागू करा
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- देशभरात बंजारा समाजाला अनुसूचित जाती (एससी) अथवा अनुसूचित जमाती (एसटी) वर्गातील आरक्षण असताना केवळ महाराष्ट्रात विमुक्त जाती (व्हीजे) म्हणून आरक्षण आहे. त्यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीत महाराष्ट्रातील बंजारा समाज मागासच राहिला आहे.
या समाजाला एसटी आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी बंजारा समाजबांधवांनी एकजुटीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
मंगळवारी, सकाळी ११ वाजता नेहरूनगर येथील संत सेवालाल चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. अशोकनगर, जुना विजापूर नाका, धर्मवीर संभाजी महाराज तलाव, पत्रकार भवन मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना शिष्टमंडळाद्वारे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मोर्चात समाजबांधव व बंजारा भगिनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्चात आमदार राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार देवानंद चव्हाण, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड, राष्ट्रीय बंजारा सेना अध्यक्ष देविदास राठोड, राष्ट्रीय गोर सिकवाडीचे अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. समाजातील सुशिक्षित युवकांनी राजकीय पक्ष व संघटनांपलीकडे एकत्र येऊन या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गोर बंजारा आरक्षण कृती समितीकडून करण्यात आले आहे.
या मोर्चात सुभाष चव्हाण, अलका राठोड, मोतीराम चव्हाण, प्रा. भोजराज पवार, युवराज राठोड, युवराज चव्हाण, नाम पवार, संदीप राठोड, सचिन चव्हाण, विजय राठोड, सुरेश पवार, लाला राठोड, मोतीराम राठोड, प्रकाश राठोड, बंटी राठोड, शैलजा राठोड, अश्विनी चव्हाण, मेनका राठोड, प्रेमसिंग राठोड, मिथुन चव्हाण, युवराज चव्हाण यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments