Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांची टिंगल लावली का? बार्शीत शेतकऱ्यांनी मंत्र्यांचा ताफा अडवला

 शेतकऱ्यांची टिंगल लावली का? बार्शीत शेतकऱ्यांनी मंत्र्यांचा ताफा अडवला




बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, सरकारच्या तुटपुंज्या मदतीवर संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना मंत्री भरत गोगावले यांचा ताफा कारी गावात अडवला.

"गोगावले शेठ, तळवटाचे पैसेही निघत नाहीत, एकरी 3400 रुपये देऊन शेतकऱ्यांची टिंगल लावली का?" असा सवाल करत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

सरकारने जाहीर केलेली 2215 कोटींची मदत अपुरी असून, हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली. माजी आमदार राजेंद्र राऊत आणि गोगावले यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

यंदा बार्शीत सरासरीच्या दुप्पट म्हणजेच 980 मिमी पाऊस पडला, ज्यामुळे 76 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सोयाबिन, फळबागा आणि द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या. भोगावती, नागझरी, रामनदीसह नद्यांना आलेल्या पुरामुळे 35 गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

78 हजार 722 शेतकऱ्यांचे 75 हजार 874 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 40 जनावरे आणि 18 हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. 155 घरांची पडझड झाली. शेतकऱ्यांनी विमा निकष बदलल्यानेही नुकसान झाल्याचा आरोप केला. विरोधी पक्षांनी हेक्टरी 30 ते 50 हजार रुपये मदतीची मागणी लावून धरली आहे. शेतकऱ्यांचा संताप आणि सरकारची अपुरी मदत यामुळे तणाव वाढत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments