जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत एमआयटी विश्वशांती गुरुकुलची उल्लेखनीय कामगिरी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय डी.एस.ओ जलतरण स्पर्धा २०२५-२६ मध्ये वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व कामगिरी करत यश संपादन केले आहे. विविध वयोगटात झालेल्या जलतरण स्पर्धांमध्ये संस्कृती कटारिया हिने १४ वर्षाखालील मुलींच्या गटात १०० मीटर फ्री स्टाईल, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात १०० मीटर फ्री स्टाईल, ५० मीटर बटरफ्लाय, २०० मीटर वैयक्तिक मेडल व रिले स्पर्धेत ओम पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला. दुसरीकडे ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये विहान पाटील याने प्रथम तर विश्वराज भुसारे द्वितीय आला. याशिवाय १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये विश्वराज भुसारे प्रथम आणि विश्वजित साळुंखे याने द्वितीय
क्रमांक मिळवून यश संपादन केले. वरद नगिमे याने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. यानंतर झालेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या ४ X १०० फ्री स्टाईल (रिले) जलतरण स्पर्धेत शाळेच्या विश्वजित साळुंखे, विहान पाटील, ओम पाटील आणि पार्थ अभंग यांच्या रिले संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व अशी कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवत शाळेचा झेंडा उंचावला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी म्हणाले ‘आमच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिद्द व घेतलेले परिश्रम हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि विभागीय स्पर्धेतही आमचे विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील याची आम्हाला खात्री आहे.’ यावेळी त्यांनी जलतरण प्रशिक्षक साहिल राणा यांच्या मार्गदर्शन व प्रशिक्षणाचा विशेष उल्लेख केला. यावेळी संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि आगामी स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments