Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान.! शेतातील पीकं पडली आडवी; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा

 सोलापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान.! शेतातील पीकं पडली आडवी; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा






गावात पाणी, घरात पाणी, ओढ्यांना पूर नागरिकांची उडाली तारांबळ

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला आहे. माढा आणि करमाळा तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. सीना नदीला आलेल्या पूरामुळे २६ गावांना फटका बसला आहे. दोन्ही तालुक्यातील १,८०० ग्रामस्थ पुरामध्ये अडकले होते. या सर्वांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. करमाळा तालुक्यातील १० गावांचा देखील संपर्क तुटला आहे. संभाव्य पूरस्थितीबाबत प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. तर करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी हातात काठी घेऊनच परिस्थितीत धोकादायक वाहतूक करू पाहणाऱ्या नागरिकांना परतवून लावले आहे.

अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने सीना, कोळेगाव धरण क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने ५२ हजार क्यूसेक वेगाने सीना नदीपात्रात पाणी सोडले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील २६ गावांना पुराचा फटका बसला आहे. करमाळा तालुक्यातील ६५० ग्रामस्थांना स्थलांतर सुरू केले आहे. माढा तालुक्यातील १,२०० ग्रामस्थांचे देखील स्थलांतर करण्यात येत आहे. आज संध्याकाळनंतर करमाळा आणि माढा तालुक्यातील पूरस्थिती गंभीर होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीचे पाणी गावात शिरायला सुरुवात झाली आहे. मोहोळ तालुक्यातील साबळेवाडी गावात नदीपात्रापासून १ किलोमीटर अंतरावर शेतात पाणी घुसले आहे. त्यामुळे सोयाबीन, तुर, कांदा, ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २ लाख क्यूसेक वेगाने सीना नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सीना नदीला महापूर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सोलापुरातील बार्शी तालुक्याला कालरात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. बार्शी तालुक्यातील चांदणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चांदणी नदीला पूर आल्याने गावाकडे जाणारे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे आगळगाव, मांडेगाव, खडकलगाव, धस पिंपळगाव, देवगाव आणि कांदलगाव या गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळे उडीद, कांदा, सोयाबिन आदी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावात सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना पूर आला आणि पाण्याचे लोंढे थेट गावात शिरले. गावातील वेशीपर्यंत गुडघाभर पाणी साचले होते, तर धनगर गल्लीतील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने लोकांची तारांबळ उडाली.

यामुळे नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून काशिविश्वेश्वर मंदिरात आश्रय घ्यावा लागला. फरशी ओढ्यावरून पाणी वाहत असल्यामुळे जेऊर ते अक्कलकोट आणि स्टेशनकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद झाले आहेत, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. या जोरदार पावसामुळे परिसरातील ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

यामुळे केळी, ऊस, तूर, सोयाबीन आणि सूर्यफूल यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. माढा तालुक्यातील वडशिंगे येथे पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या पाच जणांना ग्रामस्थांनी बाहेर काढून वाचवले. माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या पावसाने थैमान घातले. बार्शी ते तुळजापूर राज्यमार्गावर झाड पडल्याने मार्ग वाहतुकीसाठी रात्री बंद झाला.

कुईवाडी-बार्शी रस्त्यावरुन माढा मार्गे येत असताना इनोव्हा गाडी रात्री दोनच्या सुमारास गावानजीकच्या ओढ्यातून पाण्यात वाहून जात पुढे अडकली. यात पाच जण प्रवास करत होते. आनंद बगली आणि आणखी एक असे दोघे सोलापूर येथील तर सचिन शिराळ, रणजित चिंबल, सुशांत शिवशरण हे तिघे मोहोळचे रहिवासी प्रवास करत होते.

रात्री दोनच्या सुमारास वडशिंगे येथील ग्रामस्त तातडीने वाहन वाहून गेलेल्या ठिकाणी पोहचले. वाहनात अडकलेल्यापर्यंत दोरखंड व साखळी बांधत ते पोहचले. अडकलेल्या पाच जणांना ग्रामस्थांनी वाचवले.रविवारी रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. माढा बार्शी, माढा वैराग रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं आहे.
माढा तालुक्यातील वाकाव तांदुळवाडी, राहुल नगर आणि दारफळ या गावांना पडू लागला पाण्याचा वेढा बसला आहे.

पावसामुळे भूम, परांडा इथही हाहाकार माजला आहे.
हा महाप्रलय आहे, हा निसर्गाचा मोठा अपघातच म्हणाव लागेल. शेतकऱ्याच्या घरात पाणी, शेतात पीकं आडवी झाल्याने डोळ्यात अश्रूंच्या धारा पाहायला मिळत आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील परंडा आणि भूम तालुक्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे बांधावर जाऊन पाहणी केल्या आमदार तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
सरकार खंबीरपणे उभा राहील, सरकारचे पंचनामे आणि मदत होईल, मात्र त्या अगोदर नुकसान ग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल, असे म्हणत तानाजी सावंत यांच्याकडून कार्यकर्त्यांना नुकसान ग्रस्तांच्या याद्या करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
खरिपाची पिके गेली, रब्बीची पेरणी होणार नाही, पुढे मोठा पाऊस आहे, पेरण्या लांबल्या गेल्या तर ओल्या दुष्काळाची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
धाराशिवच्या परांडा येथील देवगावात चांदणी नदीचे पाणी वस्तीत घुसलं आहे. त्यामुळे, वस्तीतील घरांना कुलूप लावून लोक बाहेर पडली आहेत. चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे गावाला पाण्याचा वेडा, महिलांसह गावकरी छतावर चढले होते.

पुराच्या पाण्यात पूर्णपणे संसार भिजला, काही घरांत सकाळपासून अन्नाचा कण शिजला नाही, असा थरारक अनुभव लोकांनी सांगितला.

भिंत खचली, चूल विझली होतं नव्हतं गेलं, अशीच परिस्थिती देवगावच्या वस्तीत पाहायला मिळाली, वस्तीत गुडघाभर पाणी आहे, पुराच्या पाण्यातून मार्ग काढत जीव वाचवत आहेत.
धाराशिवच्या देवगाव इथ घराच्या मंदिराच्या छतावर चढून गावकरी सैन्य दलाकडून रेस्क्यू करण्याची वाट पाहत होते. 24 जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे.

वस्तीच्या कडेला 30 ते 35 फूट पाणी, हेलिकॉप्टर आलं नसतं तर आम्ही वाचलो नसतो, असे रेस्क्यू करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी सांगितले.

सोलापूर जि्ल्ह्यातील करमाळ्यातील सीना नदीकाठी पाणी पातळी वाढू लागल्याने अनेक गावात पाणी शिरू लागले. करमाळा तालुक्यातील संगोबा पूल, निलज, खडकी, बिटरगाव, अलजापूर ,तरडगाव , बालेवाडी , पोटगाव, बोरगाव ,दिलमेश्वर या गावानं सीना नदीच्या पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.

माढा तालुक्यातील वडशिंगे येथील ओढ्यात इरटिगा कार वाहून गेली'

माढा तालुक्यातील वडशिंगे येथील ओढ्यात इरटिगा कार वाहून गेली असून सोमवारी (ता. २२) रात्री दीडच्या सुमारास वडशिंगे येथील ग्रामस्थांनी स्वतःच्या धोक्यात घालून या पाच जणांना वाचवले.

रविवारी रात्री व सोमवारी पहाटे माढा तालुक्यातील सर्व महसुली मंडळात जोरदार पाऊस झाला. वडशिंगे भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. रात्रीच्या सुमारास बार्शी वरून माढ्याच्या दिशेने येणारी एक ईरटीगा गाडी वडशिंगे येथील ओढ्यामध्ये वाहून गेली. यावेळी या ईरटीगा गाडीमध्ये पाच जण होते. ओढयामध्ये वाहून गेलेली ईरटीका गाडी ओढ्याच्या काही अंतरावर असलेल्या मंदिराच्या बांधकामाना लागून थांबली.

यावेळी गाडीत असलेल्या पाच जणांनी आरडाओरडा केला. रात्री दीडच्या सुमारास वडशिंगे येथील ग्रामस्थांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत ओढ्यामधून दोराच्या साह्याने ईरटीगा गाडीमध्ये अडकलेल्या पाच जणाला बाहेर काढले व जीवदान दिले. सकाळी ग्रामस्थांनी ओढयामधून ईरटीगा गाडी ट्रॅक्टरच्या साह्याने ओढून बाहेर काढली.
Reactions

Post a Comment

0 Comments