Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यमंत्री कदम यांच्या कडून करमाळा व माढा तालुक्यातील शासकीय योजनांचा आढावा

 राज्यमंत्री कदम यांच्या कडून करमाळा व माढा तालुक्यातील शासकीय योजनांचा आढावा





सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-  राज्यात दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रम महसूल विभागाच्या वतीने घेण्यात येत आहेत. या मध्ये शेतातील पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण, अतिक्रमण हटवणे, नवीन रस्ते तयार करणे, अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण, जिवंत सातबारा नोंदी व वाटप याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश, गृह, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा, अन्न औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.
     करमाळा येथे आयोजित करमाळा व माढा तालुक्यातील विविध शासकीय विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, माळ्याचे गटविकास अधिकारी महेश सुळे करमाळ्याचे गटविकास अधिकारी अमित कदम यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
    राज्यमंत्री कदम यांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाडा उपक्रमात महसूल विभागाच्या विविध कामांची प्रगती तपासली. तसेच घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू शासनामार्फत दिली जाते. याची अंमलबजावणी होत आहे का याची चौकशी करण्यात आली. वाळू उपलब्ध नसल्यास जप्त वाळू किंवा अधिकृत वाळू उपसा गटांमार्फत मोफत वाळू देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. करमाळा व माढा तालुक्यातील घरकुल उद्दिष्ट पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
      तलाठी व ग्रामसेवकांनी महसूल निर्णयांची अंमलबजावणी करून नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवावी, तसेच देवस्थान इनामी जमिनी, गौण खनिज व भूमी अभिलेखांचे पुनरावलोकन करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आढाव्यात अंत्योदय योजनेत नवीन नावे घेताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे व गरजूंनाच लाभ मिळावा याची दक्षता घेण्याचे निर्देश श्री. कदम यांनी दिले.
     ग्रामविकास विभागाच्या योजनांमध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना, मनरेगाअंतर्गत विहिरी, शाळांचे कंपाउंड, अंतर्गत रस्ते, दिव्यांग प्रमाणपत्र वाटप यांचा समावेश असून, मिळालेला निधी पूर्णपणे खर्च करावा व मागील वर्षी खर्च न झाल्याची कारणे सादर करावीत, अशी सूचना करण्यात आली. याबाबतचा आढावा २ ऑक्टोबरनंतर घेण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच अन्न औषध प्रशासनाने जिल्ह्यात कुठेही भेसळ होणार नाही याबाबत काटेकोरपणे नियोजन करावे, असेही त्यांनी निर्देशित केले.
    या बैठकीत महसूल, ग्रामविकास, अन्न नागरी पुरवठा व अन्न औषध प्रशासन विभागाच्या योजनांची अंमलबजावणी, सेवा पंधरवाडा उपक्रम, घरकुल वाटप, वाळू वितरण, रोजगार हमी योजना व अंत्योदय  योजनेचा आढावा घेण्यात आला. प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी करमाळा व माढा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या कामकाजाची माहिती बैठकीत सादर केली.

Reactions

Post a Comment

0 Comments