Hot Posts

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत- पालकमंत्री गोरे

 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत- पालकमंत्री गोरे



               
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील  मंडळाच्या ६ मंडळातील गावांमध्ये शेतपीक, फळपीक, बंधारे, रस्ते, घरे, पुलांचे नुकसान झाले आहे. आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही  ग्रामविकास व पंचायत राज मंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील महिम, येथील वाहून गेलेल्या पुलाची, तसेच महूद वाकीशिवणे,कडलास येथील घरे, शेतीचे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री गोरे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.  

यावेळी  त्यांच्या समवेत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार संतोष कणसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी लांडगे, गटविकास अधिकारी उमेश कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गोरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतपिकांचे, घरांचे तसेच सार्वजनिक मालमत्तांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.

महिम येथे अतिवृष्टी झाल्याने दोन मुले वाहून गेली होती. त्या ऐवळे कुटुंबीयांना आवश्यक ती मदत करण्यात येईल. महिम येथे अरुंद पूल असून पुलाच्या रुंदीकरणाचे काम  संबंधित विभागाने तात्काळ करावे. कडलास येथे ढगफुटी झाल्याने कोळी बांधवांच्या राहत्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून, ज्यांना  आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहेत त्यांची कामे तात्काळ सुरू करावीत तसेच ज्यांना जागा उपलब्ध नाहीत त्यांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना ही यावेळी त्यांनी दिल्या.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना पालकमंत्री गोरे यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना धीर दिला. तसेच शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी असून शासनतर्फे नुकसानी संदर्भात लवकरच मदत दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
*उंदरगाव ता. माढा -
    जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत होत असलेला पाऊस, अतिवृष्टी तसेच सीना व भीमा नदीला आलेला महापूर यामुळे सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून खरीप हंगामाची जवळपास सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने जी जी मदत देणे शक्य आहे ती मदत देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करताना दिले. तसेच अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची सर्व माहिती मंत्रिमंडळ बैठकीत ठेवून शासनाकडून जास्तीत जास्त मदत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
Reactions

Post a Comment

0 Comments