राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांचा न्यायासाठी लढा
मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत काम करणाऱ्या हजारो कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी आपले न्याय हक्क सिद्ध करण्यासाठी १९ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवा ठप्प झाली असून, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, समन्वयक, सहाय्यक आदी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शासनाने १४ मार्च २०२४ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, १८ महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्याची तातडीने अंमलबजावणी करा. अशी मागणी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेल द्वारा केली.
शासनाची तातडीची जबाबदारी :
शासनाने ८ मार्च २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानंतर १८ महिन्यांपासून कारवाई न झाल्याने असंतोष वाढला आहे. ८ व १० जुलै २०२५ रोजी झालेल्या चर्चांमधूनही तोडगा निघाला नाही. परिणामी, कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवा ठप्प झाल्यामुळे शासनाने तातडीने या न्याय्य मागण्यांचा विचार करून, १४ मार्च २०२४ रोजीचा शासन निर्णय त्वरित अंमलात आणावा, अशी कर्मचाऱ्यांची ठाम मागणी आहे.
0 Comments