सरकारला ६ ठोस मागण्या; पूरग्रस्तांसाठी माकपचा आवाज बुलंद
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने व पुरामुळे ग्रामीण भागात अक्षरशः हाहाकार माजला आहे. गावोगावे पाण्याखाली गेल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून जनावरे सैरावैरा धावत सुटली आहेत. शेतकऱ्यांची पिके वाहून जाऊन होत्याचे नव्हते झाले आहे. मात्र प्रशासन केवळ कागदोपत्री पंचनामे करून थातुरमातुर उपाययोजना करत असल्याचा आरोप करत, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करून तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली.
राज्य सरकारकडे लेखी निवेदन सादर करताना “पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ प्रशासकीय उपाययोजना करण्यात याव्यात; अन्यथा मंत्रीमंडळाला स्वस्थ बसू देणार नाही,” असा ठाम इशारा माकपचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख मेजर यांनी दिला.
यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर, वडकबाळ, कवठे परिसरात माकप व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी दौरा करण्यात आला. या शिष्टमंडळात कॉ. युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली माकपचे विल्यम ससाणे, ॲड. अनिल वासम, दत्ता चव्हाण, दीपक निकंबे, सुलेमान शेख, जावेद औटी, वसीम मुल्ला, अप्पाशा चांगले आदींचा सहभाग होता.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
1. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेल्याने सर्वांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी.
2. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३८ गावांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा.
3. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये मदत द्यावी.
4. उसाचे थकित बिले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखानदारांवर कडक कारवाई करून एफ.आर.पी.प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
5. ज्या कुटुंबांच्या घरात पूरपाणी शिरले आहे, त्यांना प्रति सदस्य १० हजार रुपये त्वरित मदत द्यावी.
6. जनावरांसह स्थलांतर केलेल्या शेतकऱ्यांना प्रति जनावर ५० हजार रुपये अनुदान द्यावे.
0 Comments