न्यायालयात मराठा समाजाचा विजय ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 19, 2025

न्यायालयात मराठा समाजाचा विजय !

 न्यायालयात मराठा समाजाचा विजय !




आरक्षणाच्या GR विरोधातील याचिका न्यायाधीशांनी फेटाळली


मुंबई (कटूसत्य वृत्त):- मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियरनुसार आरक्षण देण्याबाबतच्या सरकारच्या जीआरला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. याबाबतच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जीआरला विरोध करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

वकील विनित धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हायकोर्टात दोन सत्रात सुनावणी पार पडली. हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर हायकोर्टाने विनित धोत्रे यांची याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही, असं म्हणत याचिका फेटाळली. त्यामुळे मराठा समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे.


हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

"याचिकाकर्त्याने जनहित याचिका दाखल केली आहे. पण या याचिकेमधील मुद्दे आणि मागणी पाहता व्यापक जनहित दिसत नाही. त्यांना जीआरवर आक्षेप असेल तर त्यांनी स्वत:ची वैयक्तिक रिट याचिका दाखल करावी", असं म्हणत मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळली. पण यावेळी मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वाची मुभादेखील दिली आहे. याचिकाकर्त्यांनी वरच्या न्यायालयात जावं किंवा जीआरविरोधात इतर रिट याचिका ज्या दाखल करण्यात आल्या आहेत त्या इंटरलिंक करण्याची मुभा कोर्टाने दिली आहे.

सरकारकडून महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी मुंबई हायकोर्टात युक्तिवाद केला. शासन निर्णयाने शेड्यूल कास्टमधील कुणीही बाधित नाही, अशी माहिती महाधिवक्तांनी कोर्टात दिली. त्यानंतर हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना महत्त्वाचा सवाल केला. या जीआरमुळे याचिकाकर्ते बाधित कसे? असा प्रश्न हायकोर्टाने विचारला. तसेच जनहित याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नाही, असं हायकोर्टाने स्पष्ट केलं. तसेच जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही, असंही हायकोर्ट म्हणालं.

इतर याचिकांचं काय होणार?
मराठा आरक्षणाचा नवा जीआर लागू झाल्यानंतर ओबीसी समाजातील नेते मंडळी आणि अभ्यासकांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळाला. अनेक ओबीसी नेते नाराज झाले. त्यांनी हायकोर्टात जाण्याची तयारी केली. अनेकांनी हैदराबाद गॅझेटियरच्या नव्या जीआरला कोर्टात आव्हान देणाऱ्या याचिका दाखल केल्या आहेत. त्यापैकी पहिली याचिका वकील विनित धोत्रे यांनी दाखल केली होती. यानंतर अनेकांनी याचिका दाखल केल्या आहेत. हायकोर्टाने पहिल्या जनहित याचिकेवर आज सुनावणी घेत ती याचिका फेटाळून लावली आहे. पण मराठा आरक्षणाच्या नव्या जीआरला विरोध करणाऱ्या इतर याचिंकांबाबत हायकोर्ट काय निर्णय घेणार? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधातील याचिका फेटाळल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे, गोरगरिबांच्या बाजूने न्यायदेवता उभी राहाते, सरकारनंतर न्यायदेवता हीच गोरगरिबांचा आधार आहे. सरकारला त्यांची बाजू भक्कमपणे मांडावीच लागणार आहे, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी भुजबळांचा उल्लेख अलिबाबा असा केला आहे. येवल्याचा अलिबाबा दोन आरक्षण खात आहे, त्यांना लवकरच बेसन -भाकरी खावी लागेल असा खोचक टोला यावेळी जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना लगावला आहे. मी गोरगरिबांसाठी सर्व काही करत आहे. समाजाला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काही अभ्यासकांनी समाजाला अजून काहीच दिलं नाही, मी माझं काम करत आहे, त्यामुळे समाजाने जे गैरसमज पसरवतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, असं देखील यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages