अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील संगोबा गावातील शेतीचे मोठे नुकसान
खेड (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील संगोबा गावात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी करताना पंचनामे करून, तसेच मागील पुरस्थितीचा विचार करून संपूर्ण गावातील शेतकऱ्यांना न्याय्य नुकसानभरपाई देण्याची विनंती केली आहे.
ग्रामस्थांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज संगोबा गावाला भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपस्थित अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची सविस्तर माहितीही त्यांनी घेतली. ग्रामस्थ व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण आणखी वाढल्यास आगामी काळात पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले.
या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत कदम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री कदम यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा वेगाने पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळू शकेल. तसेच संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन बचावकार्य, आरोग्यसेवा व तात्पुरत्या निवाऱ्याच्या सुविधा यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही कदम यांनी दिले. त्यांच्या या पाहणी दौर्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments