Hot Posts

6/recent/ticker-posts

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत

 अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत



– उपमुख्यमंत्री अजित पवार

    सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

कोर्टी (ता. करमाळा), मुंगशी (ता. माढा), लांबोटी (ता. मोहोळ) या भागांतील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता धीरज साळी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, करमाळा, माढा, मोहोळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावे, त्यांना अन्न, पाणी, वीज व औषधांची सुविधा पुरवावी, तसेच ज्यांचे धान्य भिजले आहे त्यांना तात्काळ धान्य उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उडीद, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घरांचे व पशुधनाचेही नुकसान झाले आहे. सर्व नुकसानग्रस्त घटकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

                  पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी महामुनी मंगल कार्यालय, संगोबा रोड, करमाळा येथे तात्पुरते पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले असून उपमुख्यमंत्री पवार यांनी त्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.


Reactions

Post a Comment

0 Comments