पावसाचा फळबागांना तडाखा; लाखो रुपयांचे नुकसान
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- सततधार पावसाने फळपिकांची मोठी हानी झाली असून लाखो रुपये खर्च होऊन ही शेतकऱ्याच्या पदरी निराशाच आली आहे.माढा तालुक्यातील अकोले-खुर्द येथे ही कोट्यवधी रुपये किमतीचे शेकडो एकर डाळिंब,केळी अशी पिके वाया गेली आहेत.यामुळे या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
अकोले-खुर्द येथील संपूर्ण परिसर हा उजनी धरणाच्या बॅकवॉटर पाण्यामुळे शंभर टक्के बागायत झालेला भाग आहे.या ठिकाणी ऊस,केळी,डाळिंब,पेरू यासह टोमॅटो,ढोबळी मिरची अशी भाजीपाल्याची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत.चालू वर्षी मे मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने हाहाकार उडविला.तेव्हापासून सलग पाऊस पडत आहे.या पावसाने कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले होते.मात्र त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या पावसाचा लाभ झाला होता.मात्र सध्या सुरू असलेला पाऊस अतिशय हानिकारक आहे.मोठ्या प्रमाणात पाणी पडत आहे.शेतकऱ्यांची डाळींब,केळी व इतर पिके काढणीस आलेली आहे.तसेच या पिकासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केलेले आहेत.
आठवड्यापासून दररोज तुफान पाऊस पडत असल्याने फळबागेत पाणी साचून राहत आहे.यामुळे तयार झालेले डाळिंब,केळी व पेरू हे पीक वाया जात आहे.फळे सडून जाऊ लागली आहेत.यामुळे शेतकऱ्यांची धाकधुक वाढल्याने शेतकऱ्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे.पिके वाया जाऊ लागल्याने लाखो रुपयांची कर्जे कशी फेडायची अशी शेतकऱ्यास धास्ती वाटत आहे.
यामुळे शासनाने पावसाचे पाणी साचून या पाण्यामुळे वाया गेलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे सुरू करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
0 Comments