मिरवणुकीतील देखाव्यांनी वेधले अक्कलकोटमध्ये भाविकांचे लक्ष - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 8, 2025

मिरवणुकीतील देखाव्यांनी वेधले अक्कलकोटमध्ये भाविकांचे लक्ष

 मिरवणुकीतील देखाव्यांनी वेधले अक्कलकोटमध्ये भाविकांचे लक्ष



अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):-

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गजरात शहर व तालुक्यात शनिवारी रात्री बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदा डीजे व डॉल्बीला बंदी असल्याने विसर्जन मिरवणुका पारंपरिक ढोल, ताशा, लेझीम यांच्या गजरात पार पडल्या. त्यामुळे जल्लोषाची रंगत काहीशी कमी जाणवली. मात्र, मिरवणुकीतील देखावे, भक्तिभाव आणि शिस्तीने नटलेला उत्सव हा अनोखा अनुभव देणारा ठरला. 

शहरातील ४७ मंडळांनी मिरवणुका काढल्या. कारंजा चौकातील जुन्या नवभारत गणेशोत्सव तरुण मंडळाच्या लेझीम खेळाने विशेष लक्ष वेधून घेतले. या मंडळाच्या मिरवणुकीचे उद्घाटन आमदार सचिन

कल्याणशेट्टी व त्यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले. मिरवणुका बसस्टैंड, मेनरोड, विजय चौक, कारंजा चौक, तूप चौक, फतेसिंह चौकमार्गे हत्ती तलावाकडे मार्गस्थ झाल्या.

मिरवणुकीतील देखाव्यांनी यंदाच्या उत्सवाला खास रंगत दिली. नवभारत गणेशोत्सव तरुण मंडळाने गोल्डन टेंपलचा देखावा, तर ब्रह्मांडनायक गणेश मंडळ, समर्थ नगर यांनी पंढरपूर आषाढी वारी रिंगण सोहळ्याचा देखावा सादर केला. शिवाजीनगर मंडळाने नृसिंह व देवी जगदंबा यांचा देखावा, तर श्री वीरशैव हरळय्या गणेश मंडळ, हरयाळकर गल्ली यांनी पंचमुखी महिषासुरमर्दिनीचा देखावा उभारला होता. अक्कलकोटचा राजा गणपती, जुना राजवाडा मंडळाने लव्ह जिहाद या विषयावर देखावा, तर कुंभार गल्ली मंडळाने विठ्ठल पालखी सोहळ्याचे चित्रण केले. याशिवाय श्री एकता गणेशोत्सव

तरुण मंडळ, जुना पॉवर हाऊस यांनी नियोजित अक्कलकोटचा भव्य बसस्टँडचा देखावा, तर राम गल्ली मंडळाने ऑपरेशन सिंदूर आणि सौंदत्ती यल्लमा हे देखावे सादर केले होते. सुभाष गल्ली मंडळाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षांचा देखावा, तर जय जवान गल्ली गणेश मंडळाने सुचीचे राजकारण या विषयावर प्रबोधन केले. वेताळ चौक मंडळाने श्री स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन, तर बसवेश्वर तरुण मंडळ, माळी गल्ली यांनी शेतकन्यांच्या व्यथा या वास्तववादी विषयावर लक्ष वेचले, शिवभक्त बेडर कन्नया चौक मंडळाने काली मातेला तर देशमुख गल्ली मंडळाने रथाचा देखावा सादर करून भक्तांचे मनोरंजन केले. दुपारी पाचच्या सुमारास सुरू झालेल्या मिरवणुका रात्री बारापर्यंत चालू होत्या. संध्याकाळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व पोलीस निरीक्षक दीपक मिताडे यांनी मार्गावरील मिरवणुकीची  पाहणी केली. 

या विसर्जन सोहळ्यात माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, दिलीप सिध्दे, महेश हिंडोळे,  अविनाश मडिखांबे, सिध्दार्थ गायकवाड, यशवंत घोंगडे, शिवशरण जोजन विश्वनाथ भरमशेट्टी, नन्नू कोरबू, शिवशरण वाले, प्रदीप पाटील, नागराज कुंभार, रजाक सय्यद आदी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages