Hot Posts

6/recent/ticker-posts

शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा

 शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा


आढावा बैठकीत आमदार आवताडे यांची सूचना
पंढरपूर  (कटुसत्य वृत्त):-  पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या  घरकूल, जलजीवन आणि  अहिल्यादेवी सिंचन विहीर या संदर्भातील अडीअडचणी सोडवण्यासाठी बुधवारी पंढरपूर पंचायत समिती येथील शेतकी भवन येथे आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी नागरिकांना या योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
आढावा बैठकीच्या सुरुवातीला आमदार आवताडे यांनी या योजनांचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटशिक्षणाधिकारी सुशील संसारे उपस्थित होते..
या बैठकीसाठी पंढरपूर तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
या बैठकीत नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. या अडी-अडचणी जाणून घेऊन आमदार आवताडे यांनी संबंधित अधिकारी आणि तक्रारदार नागरिक, गावातील सरपंच यांना समोरासमोर बोलावून लवकरात लवकर समस्यांवर तोडगा काढून प्रश्न सोडवण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी बोलताना आमदार आवताडे यांनी भारतीय जनता पक्ष सरकारने राज्यातील नागरिकांसाठी घरकूल आणि अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजना राबवल्या आहेत. या सर्व योजना नागरिकांपर्यंत विनाअडथळा पोहोचवाव्यात, मतदारसंघातील काही गावांमध्ये विहिरींचे लाभार्थी अत्यंत कमी प्रमाणात ते वाढवावेत तसेच जनतेच्या प्रश्नांवर तोडगा शोधावा, असे आवाहन केले. शेततळ्यांसाठी जादा अनुदान मिळावे यासाठी सभागृहात कृषिमंत्र्याकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
याचबरोबर जलजीवन मिशनअंतर्गत होणारी कामे दर्जेदार पद्धतीचे करून घ्यावीत. या योजनेबाबत उदासीनता असल्याची खंत व्यक्त करत यांनी, कामे पूर्ण झाल्याशिवाय बिल देऊ नयेत. झालेल्या कामाचा दर्जा तपासावा, अशा सूचना केल्या. मतदारसंघातील ज्या लोकांच्या जलजीवन योजनेबाबत तक्रारी आहेत, अशा नागरिकांनी आपल्याकडे लेखी स्वरूपात अर्ज द्यावेत, त्यावरती मी लवकरच कार्यकारी अभियंता व संबंधित सर्व अधिकारी, ठेकेदार यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी घरकूल योजनेतील लाभाथ्यांचे एकही घरकूल रद्द करू नये. जागेची समस्या असल्यास त्यावर योग्य तोडगा काढून गायरान, गावठाण यामध्ये जागा उपलब्ध करून द्यावी.
 जागेसाठी शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत घेऊन घरकूल पूर्ण करावे. घरकूल बांधकामासाठी शासनाच्यावतीने देण्यात येणारी मोफत बाळू मातीमिश्रित न देता चांगली द्यावी, अशा सूचना प्रशासनाला केल्या.
Reactions

Post a Comment

0 Comments