Hot Posts

6/recent/ticker-posts

अंशत: अनुदानित शाळांवरील ५२ हजार २७६ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार

 अंशत: अनुदानित शाळांवरील ५२ हजार २७६ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार





सोलापूर (कटूसत्य वृत्त):-:- राज्यातील अंशत: अनुदानित शाळांवरील ५२ हजार २७६ शिक्षकांचा पगार आता २० टक्क्यांनी वाढणार आहे. शासनाच्या निर्णयामुळे दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाच हजार ७५४ शाळा आणि सहा हजार ६२६ तुकड्यांना ते अनुदान मिळणार आहे.

मात्र, २० टक्के अनुदान देण्यापूर्वी संबंधित शाळांनी २० अटींची पूर्तता केल्याची खातरजमा शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.

टप्पा अनुदान मिळणाऱ्या शाळा, तुकड्या व त्यावरील मंजूर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी शिक्षण संचालकांना पाठविली जाणार आहे. दरम्यान, भविष्यात पटसंख्येअभावी शाळा, तुकडी बंद पडल्यास अनुदानही बंद होणार आहे. तसेच नियमबाह्य अनुदान घेत असल्याचे आढळल्यास त्या शाळा, तुकड्यांचे अनुदान थांबविले जाणार आहे. पूर्वी मंजूर पदांसाठीच हे टप्पा अनुदान लागू असणार आहे.

याशिवाय संच मान्यता करताना एकाच शाळेत अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यिता तुकड्या एकच युनिट समजून संचमान्यता करण्याचेही शिक्षण संचालकांचे आदेश आहेत. आरक्षण धोरणानुसार पदभरती केल्याची व मंजूर पदांची खात्री शिक्षणाधिकाऱ्यांनी करायची आहे. सर्व बाबींची खात्री झाल्यावर टप्पा अनुदान मंजूर करून सात दिवसांत आदेश द्यावेत, असेही संचालकांच्या आदेशात नमूद आहे. सप्टेंबरअखेर शाळांना टप्पा अनुदानाचे आदेश वितरित केले जाणार आहेत.

परिपूर्ण प्रस्ताव अपेक्षित, लगेच मिळणार आदेश

चौकट-
अंशत: अनुदानित शाळांना टप्पा अनुदानाचे आदेश वितरित करण्यासंदर्भातील शिक्षण संचालकांचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार पुढील आठवड्यापासून शाळांचे प्रस्ताव ऑफलाइन स्वीकारले जातील. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने सोलापुरातील एक ठिकाण निश्चित केले जाईल. प्रस्ताव परिपूर्ण असलेल्या शाळा- तुकड्यांना लगेच ऑनलाइन आदेश दिले जातील.

- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

Reactions

Post a Comment

0 Comments