बंद पडलेल्या जिल्हा दूध संघाच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- बंद पडलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध व प्रक्रिया संघाची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी, दिनांक ३० सप्टेंबर रोजी संघाच्या मुख्यालयात होणार आहे. सध्या संघावर आर्थिक संकट गडद झाल्याने व दूध संकलन पूर्णपणे ठप्प झाल्याने ही सभा अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
संघावर सध्या ६० कोटी रुपयांहून अधिक कर्जाचा बोजा आहे. त्यातच संघाचे नियमित दूध संकलन बंद असल्यामुळे दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना कमी दर मिळत असल्याचा आरोप असून, त्यामुळे दररोज सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर, मंगळवारी होणाऱ्या सभेत दूध संकलन बंद होण्यामागची कारणे, संघाच्या आर्थिक अडचणी आणि व्यवस्थापनातील अपयश यावर सभासदांकडून संचालक मंडळाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.
अध्यक्षांची संभाव्य अनुपस्थिती, संचालक मंडळाला 'थेट' रोषाचा सामना ?
मागील सभेप्रमाणेच यंदाही संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यावेळी संपूर्ण रोष संचालक मंडळावरच उतरू शकतो. संघाच्या कामकाजावर नाराज असलेल्या सभासदांनी यापूर्वीही संचालक मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते.
स्थावर मालमत्तांचा वापरही अयशस्वी
संघाच्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी स्थावर मालमत्ता विकून कर्ज फेडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तो अद्याप यशस्वी ठरलेला नाही. दुसरीकडे, संघाचे व्यवस्थापन नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डकडे (NDDB) हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र त्यातही फारशी प्रगती झालेली नाही.
गोंधळाची शक्यता
संघाच्या आर्थिक व प्रशासकीय दुर्दशेबाबत संतप्त सभासद सभेत प्रश्न विचारतील व गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संचालक मंडळाला या परिस्थितीचा कसा सामना करायचा, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सभासदांच्या रोषाला कसे सामोरे जाणार?
जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ आल्यापासून संघाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप सभासदांकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाला जबाबदारी स्विकारण्याची वेळ आली असून, सभासदांच्या तीव्र रोषाला कसे तोंड दिले जाईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
.jpg)
0 Comments