हिम्मत असेल तर एका
व्यासपीठावर या :सपाटे
मराठा मंडळाच्या सभेत विरोधकांना खुले आव्हान
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- - आपल्या विरोधात रान उठवून छत्रपती शिवाजी प्रशालेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांनी हिम्मत असेल तर एका व्यासपीठावर यावे,आपण त्यांना ते आमदार देवेंद्र कोठे यांचे हस्तक आणि सूर्याजी पिसाळ यांचे वंशज कसे आहेत हे जनतेसमोर सिद्ध करून दाखवू,असे खुले आव्हान मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी विरोधकांना दिले.
शनिवारी, हरिभाई देवकरण प्रशालेच्या मागे असलेल्या मराठा मंदिर येथे मराठा समाज सेवा मंडळाची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा सपाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्यांनी आपल्या संस्थेवर कशा पद्धतीने प्रशासन नेण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्यासाठी आपल्याच समाजातीलच काही स्वयंघोषित पुढारी संस्थेला आणि आपल्याला अडचणीत आणण्याचा कसा प्रयत्न करीत आहेत याचा पाढाच सभासदांसमोर वाचला. यावेळी सपाटे म्हणाले, समाजातील हे लोक अवैध व्यवसायात गुंतलेले असताना तेच आपला बायोडाटा खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, आपण त्यांचा खरा बायोडाटा जनतेसमोर आणू. त्यासाठी हिंमत असेल तर त्यांनी एका व्यासपीठावर यावे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस प्रा. महेश माने यांनी करून अहवाल वाचन केले.
दरम्यान,यावेळी मंगेश जाधव, हनुमंत बेसुळके, सुरेश पवार, मारुती फंड, दत्ता भोसले, मारुती गोरे, उमाकांत निकम आदींनी मनोगत व्यक्त केले. या सभेस विनायकराव पाटील, नामदेवराव थोरात, नीलकंठ वाकचौरे, प्रभाकर खंडाळकर, महादेव गवळी, सुनीता साळुंके, रेखा सपाटे, अशोक चव्हाण यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवदास चटके यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर सपाटे यांनी मानले.
* संस्थेची लवकरच निवडणूक घेऊ *
मराठा समाज सेवा मंडळाची पंचवार्षिक निवडणूक आपण लवकरच घेणार असून त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. गणेश देशमुख यांची नियुक्ती केल्याचे मंडळाचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी जाहीर केले.
0 Comments