गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने शनिवारी रक्तदान व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
करमाळा (कटूसत्य वृत्त):-
शहरातील गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त रक्तदान व रक्त तपासणी शिबिर तसेच नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार दि. 30 ऑगस्ट रोजी, संजीवनी हॉस्पिटल, वेताळपेठ, करमाळा येथे करण्यात आले असल्याची माहिती गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी दिली आहे. गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर राहून काम करत असून यंदाच्या वर्षी शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी तसेच गरज असल्यास मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी (पुणे येथील अंधजन मंडळाचे एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय, आय केअर इन्स्टिटयूट महंमदवाडी, हडपसर, पुणे) येथे रुग्णांची मोफत ने-आण व्यवस्था केली जाणार आहे.
त्याचबरोबर देशासाठी लढणाऱ्या जखमी सैनिकांसाठी तसेच अपघातात जखमी झालेल्या गरजू रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. रक्त तपासणीमध्ये रक्तातील शुगर HBA1C, KFT किडनी टेस्ट, LFT लिव्हर टेस्ट, cholesterol कोलेस्ट्रॉल, thyroid थायरॉईड लिपिड प्रोफाइल या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. हे रक्त तपासणी शिबिर सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत, रक्तदान शिबिर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे. तरी करमाळा शहरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक प्रशांत ढाळे यांनी केले आहे.
0 Comments