Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या निकषाप्रमाणे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व स्वाधार योजनेच्या निकषात बदल करावा - प्रा. झोळ

 डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या निकषाप्रमाणे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व स्वाधार योजनेच्या निकषात बदल करावा - प्रा. झोळ

करमाळा (कटूसत्य वृत्त):- 
           महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे यांना दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, भाजपा नेते रामदास झोळ यांनी भेटून पुढील विषयावर निवेदन दिले, यामध्ये पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता ही योजना खुला प्रवर्ग, इबीसी प्रवर्ग, एसईबीसी तसेच ई डब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागासाठी सरसकट लागू आहे. तसेच त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा ही आठ लाख रुपये एवढी आहे. याचप्रमाणे ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे.
परंतु ही योजना फक्त शहरी भागाकरता असून उत्पन्नाची अट अडीच लाख रुपये एवढी आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी फक्त ६०० विद्यार्थ्यांनाच याचा लाभ देण्याची मर्यादा आहे. त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना आहे. परंतु ही योजनाही फक्त शहरी भागांसाठीच लागू असून उत्पन्नाची अट अडीच लाख रुपये एवढी आहे. 
या तीनही योजने मधील फरक पाहता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेमध्ये उत्पन्नाची अट अडीच लाखावरून आठ लाख रुपये करावी. शहरी विद्यार्थ्यांबरोबर ग्रामीण विद्यार्थ्यांनाही लाभ मिळावा. प्रति जिल्हा ६०० विद्यार्थ्यांची मर्यादा शिथिल करावी. तसेच स्वाधार योजनेमध्ये अडीच लाखाची उत्पन्न मर्यादा वाढवून आठ लाखाची उत्पन्न मर्यादा करावी. व शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळावा, असे निवेदन प्रा.रामदास झोळ यांनी दिले असून दोन्हीही मंत्री महोदयांनी या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून हे विषय लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments