मन वढाय वढाय...
मानवी मनाचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र विषय आहे, तो म्हणजे मानसशास्त्र. यामध्ये मानवी मनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो आणि त्यावरून काही सिद्धांत मांडले जातात.
आपलं मन आपल्या ताब्यात का राहत नाही? याचे उत्तर आपल्याला या मानसशास्त्रामध्ये नक्कीच मिळते. मनाला पकडून किंवा बांधून ठेवता येत नाही. म्हणूनच बहिणाबाई म्हणतात –
"मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर..."
आपण आपल्या मनाला जी आज्ञा देतो, त्याच्या उलट आपलं मन वागत असतं.
एखादा विचार अजिबात करायचा नाही असं आपण ठरवतो, पण तोच विचार हट्टाने आपल्या मनात येऊ लागतो.
शुगर वाढली म्हणून डॉक्टरांनी "गोड खाऊ नका" असं सांगितलेलं असतं, परंतु उलट मनात सारखं गोड खावंसं वाटत राहतं.
एखादी दुःखदायक घटना किंवा अपमानास्पद प्रसंग विसरण्याचा आपण सतत प्रयत्न करतो, पण तो प्रसंग मात्र वारंवार मनामध्ये घोळत राहतो.
आपण जीवनात केलेल्या चुका सतत अपराधीपणाची भावना निर्माण करत राहतात.
मन इतकं चंचल असतं की अनेक वेळा प्रयत्न करूनही आपल्याला एकाग्रता गाठता येत नाही.
झऱ्यातील पाण्याप्रमाणे मनातून सतत विचार पाझरत राहतात.
कधी कधी तर इतक्या निर्लज्ज वाईट कुकल्पना मनात येतात की आपल्याला स्वतःचीच घृणा वाटू लागते.
"मी असा कसा विचार करू शकतो?" असं वाटून स्वतःच्याच मनावर राग येतो.
म्हणूनच बहिणाबाई त्याच कवितेत म्हणतात –
"मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर
अरे, इचू साप बरा, त्याले उतारे मंतर!"
खरं तर मनाची तटस्थता गाठणे म्हणजे मानसिकदृष्ट्या सक्षम, खंबीर होणं होय.
एखाद्या घटनेनंतर, संपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्या आचरणाबाबत अथवा स्वतःच्या दैनंदिन व्यवहारात जेव्हा आपलं मन तटस्थपणे विचार करू लागतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण स्वतःच्या मनावर राज्य करू लागतो.
पूर्वग्रह, भावना आणि मनातील लालसा यामुळेच आपल्या विचारांमध्ये कलुषता निर्माण होत असते.
मनात निर्माण होणारे विविध तरंग, भावना आणि क्लेश यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे का?
मनामध्ये एखाद्याबद्दल तीव्र द्वेष भावना निर्माण होते, राग येतो, आकर्षण वाटू लागतं.
या सर्वांचं पृथक्करण करता करता आपण कित्येक वेळा दमून जातो.
आपल्या स्वतःच्या मनाची खोली आपण मोजू शकत नाही.
मन खूप शक्तिशाली आहे यात शंका नाही.
मन हे स्मृती आणि बुद्धीपेक्षा वेगळं आहे.
मन विचार निर्माण करतं, बुद्धी या विचारांमध्ये फरक करते आणि स्मृती आठवणी जपून ठेवते.
स्वामी विवेकानंद यांनी सुदृढ शरीराबरोबरच सुदृढ मन हे सर्व मानवी विकासाचे महत्वाचे तत्त्व मानले आहे.
भारतीय तत्त्वज्ञानात प्रामुख्याने मनाचा अभ्यास योगतत्त्वज्ञानात स्पष्ट होतो.
मनुष्य केवळ इंद्रियसुखाचाच विचार करत नाही, तर काही कालांतराने तो मानसिक सुखाच्या गूढ विचारात मग्न होतो.
एखादी व्यक्ती गुन्हेगार होते, तेव्हा त्याचे कारण हे त्याची इंद्रिये त्याच्या ताब्यात नाहीत म्हणून नसते; तर त्याचे मन ताब्यात नसल्यामुळे तो गुन्हेगार बनतो.
स्वतःच्या मनातील प्रबळ प्रवृत्तीनुसार त्याला वागावे लागते.
व्यक्तीच्या कर्माला त्याच्या स्वभावसिद्ध इच्छाच कारणीभूत ठरतात.
मानसशास्त्र हेच आपल्या बेताल भटकणाऱ्या मनाला आवर घालण्यास आणि इच्छाशक्ती ताब्यात ठेवण्यास शिकवते. म्हणूनच मानसशास्त्र हे सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे.
त्याचबरोबर मनाची एकाग्रता ही सर्व यशाचे मूळ कारण आहे.
मनुष्य आणि पशुत यामधील भेद हाच आहे की, मनुष्याची एकाग्रता अधिक प्रमाणात असते.मनाची एकाग्रता वाढवायची असेल तर मनाचे नियमन करावेच लागते.
स्वामी विवेकानंद यांनी मनाच्या एकाग्रतेबरोबरच एखाद्या विषयावरून आपल्या इच्छेनुसार मन काढता येणे हेही तितकेच महत्वाचे मानले आहे.
सर्व समस्यांचे मूळ हे मानवी मनाचे असंतुलन होय.प्राणायामासारख्या साधनांनी मन संतुलित करता येते, हे भारतीय तत्त्वज्ञानाने सिद्ध केले आहे.
बेताल व चंचल मन सदैव आपल्याला खाली खेचतं, म्हणून नियंत्रित मन फार महत्वाचं आहे.
याचाच अभ्यास मानसशास्त्रात केला जातो.
व्यक्तीच्या जीवनात मानसशास्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे.
0 Comments