तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंतांचा भाजप प्रवेश निश्चित
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जाहीर केला निर्णय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह समर्थकांनी रविवारी (ता. 17 ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
त्या भेटीत सावंत आणि समर्थकांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी सावंतांना मुंबई भेटीचे निमंत्रण दिले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळणार असून त्याचवेळी पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केली जाणार आहे. माजी उपमहापौर कोल्हे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
शिवसेनेच्या कामकाजात विश्वासात घेतले जात नाही, माढा मतदारसंघातील पक्षसंघटनेतील नियुक्त्या परस्पर न सांगता केल्या जात असल्याने संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतरही पक्षश्रेष्ठींकडून साधी विचारणाही न झाल्याने चिडलेल्या सावंतांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय पक्का केला आहे.
शिवाजी सावंत यांनी शनिवारी (ता. 16 ऑगस्ट) पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सोलापुरात वाडिया हॉस्पिटलमध्ये भेट घेतली होती. त्या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर रविवारी (ता. 17 ऑगस्ट) सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांची भेट घेतली. त्या भेटीत सावंतांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी दाखवली आहे.
शिवाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांना मुख्यमंत्र्यांनी मुंबई भेटीसाठी येण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत सावंत समर्थक हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहेत, त्यानंतर भाजप प्रवेशाचा कार्यक्रम हा मुंबई, सोलापूर की माढ्यात करायचा, याचा निर्णय होणार आहे.
दरम्यान, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी (ता. १८ ऑगस्ट) सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यात त्यांनी शिवाजी सावंत, त्यांचे सुपुत्र ऋतुराज सावंत, स्वतः कोल्हे यांच्यासह प्रवेश करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांची यादी दिली आहे. त्यानुसार माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला आहे.
भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर करताना माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी सोलापूर संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यावर टीकास्त्र सोडले. साठे हे तुम्हाला भारी पडले का, असे विचारले असता साठे हे टायगर आहेत, त्यामुळे ते भारी पडणारच ना. साठेंची आता शिकार होईल ना. दोन-तीन महिन्यांत, अशी बोचरी कोल्हे यांनी शिवसेना नेते साठे यांच्यावर केली आहे.
0 Comments