Hot Posts

6/recent/ticker-posts

सरन्यायाधीश गवईंनी टोल वसुलीवरून सरकारला दाखवला आरसा

सरन्यायाधीश गवईंनी टोल वसुलीवरून सरकारला दाखवला आरसा



नवी दिल्ली (वृत्त सेवा):- मुसळधार पावसामुळे सोमवारी मुंबई जणू ठप्प झाली आहे. अनेक रस्ते जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देशाच्या राजधानीतील स्थितीवरून सरकारला आरसा दाखवला आहे.

टोलवसुलीच्या एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी दोन तासांच्या पावसात संपूर्ण शहर लकवाग्रस्त होते, अशी टिप्पणी केली आहे.

टोलवसुलीबाबतही सरन्यायाधीश गवईंनी मोठे विधान केले आहे. सुप्रीम कोर्टाने केरळमधील एका हायवेवर 12 तासांच्या वाहतूककोंडीवर प्रश्न उपस्थित केला. एखाद्या व्यक्तीला संबंधित रस्त्यावर 12 तास लागत असतील तर त्याने टोल का द्यावा?, असे सरन्यायाधीश म्हणाले आहेत. केरळातील त्रिशूर जिल्ह्यात एनएच 544 वरील टोलशी संबंधित याचिकेवर आज सुनावणी झाली.

केरळ हायकोर्टाने हायवेच्या खराब स्थितीमुळे टोल वसुलीला मनाई केली आहे. त्याविरोधात 'एनएचएचआय'ने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. सरन्यायाधीश गवई, न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

कोर्टाने सुनावणीदरम्यान वारंवार मागील आठवड्यात हायवेवर झालेल्या 12 तासांच्य वाहतुककोंडीचा उल्लेख केला. रस्ता सुस्थितीत नसताना टोलवसुली कशी केली जाऊ शकते, असे कोर्टाने मागील आठवड्यातही फटकारले होते. एनएचएआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने वाहतूककोंडी झाल्याचे कोर्टात सांगितले.

त्यावर न्यायमूर्ती चंद्रन यांनी ट्रक आपोआप पलटी झाला नाही तर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पडल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी 65 किलोमीटरच्या रस्त्यासाठी किती टोल घेतला जातो, अशी विचारणा केली. त्यावर 150 रुपये द्यावे लागत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर सरन्यायाधीश म्हणाले, रस्त्याच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी 12 तास लागत असतील तर 150 रुपये का द्यावेत? ज्या रस्त्यासाठी एक तास अपेक्षित आहे, तिथे 11 तास लागतात आणि त्यासाठी टोलही द्यायचा.

सुनावणीदरम्यान एका वकीलांनी म्हटले की, 'सुप्रीम कोर्टाच्या गेट ई समोर नेहमी वाहतूक कोंडी असते. लोक एक तास उशिरा येतात. मी वकिलांना पळताना पाहिले आहे.' त्यावर सरन्यायाधीश गवई यांनी टिप्पणी केली की, दिल्लीत जर दोन तास पाऊस पडला तर संपूर्ण शहर लकवाग्रस्त होते. समुद्रालगच्या भागात तर मान्सूनमुळे खूप अडचणी येतात. आम्ही प्रत्येक बाबींचा विचार करू. आता निकाल राखून ठेवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Reactions

Post a Comment

0 Comments