स्व. गोरख माने यांच्या पुण्यस्मरणार्थ मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे कै. गोरख मारुती माने आणि ताई गोरख माने यांच्या पुण्यस्मरणानिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. यानिमित्ताने जनजागृती प्रबोधन मंच संचलित मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले.
शांतीलाल माने मित्र परिवार आणि माने कुटुंबियांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. अन्नदान म्हणून विद्यार्थ्यांना मसाला भात, पनीर भाजी, चपाती, पापड, गुलाबजाम आणि मटकीची उसळ असे पौष्टिक आणि चविष्ट जेवण देण्यात आले. हे स्वादिष्ट जेवण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा पाटील, शिक्षक, कर्मचारी तसेच माने कुटुंबीयांचे नातेवाईक उपस्थित होते. कै. गोरख माने हे सामाजिक कार्यांमध्ये नेहमीच पुढाकार घेत असत. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, समाजाला सकारात्मक संदेश देणारा आहे. माने कुटुंबीयांनी दरवर्षी अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन विशाल माने, शांतीलाल माने, प्रसाद माने, प्रतीक माने, विकास माने, ऋषिकेश कांबळे, चंदन राजभर, विक्रम कांबळे, संतोष धोत्रे, विठ्ठल पवार, धीरज लोंढे, आणि रोहन धोत्रे यांनी केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करून स्व. गोरख माने यांच्या सेवाभावी कार्याला श्रद्धांजली वाहिली.
0 Comments