सलग दोन दिवस पावसाची हजेरी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर शहर व परिसरात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पाऊस आल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. या भीज पावसामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळणार आहे. तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
दरम्यान, गेले तीन ते चार दिवस पावसाळी वातावरण तयार होत होते. हवेत गरमी जाणवत होती. परंतु पाऊस येत नव्हता, अखेर मंगळवारी रात्री पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तर बुधवारी सकाळी जोरदार पाऊस झाला आहे. चालू वर्षी पावसाळा सुरू होण्याअगोदरच पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकर्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. या खरीप पिकांसाठी जून जुलै महिन्यात पाऊस होणे गरजेचे होते. परंतु म्हणावा तसा पाऊस झाला नाही.
तालुक्याच्या काही भागातच झाल्याने खरीप पिकासाठी शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. भाटगर निरा देवधर वीर या धरणातून होणार्या पाण्याच्या सिंचनाच्या लाभ क्षेत्रातील शेतकर्यांना मात्र पाण्याचे आवर्तन मिळालेले खरीप पिकांसाठी लाभदायक ठरले आहे. पंढरपूर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, गाव तलाव, पाझर तलावात अद्यापही म्हणशवा तसा पाणी साठा झालेला नाही.
मात्र, उजनी कालव्यातून माण नदीवरील बंधारे तर नीरा उजवा कालव्याव्दारे कासेगाव, खर्डी, बोहाळी, उंबरगाव, तिसंगी येथील ओढ्यावरील बंधारे, गाव तलाव भरुन घेण्यात येत आहे. कारण दोन दिवस झाले जोरदार पाऊस पडत असल्याने शेतकरी कॅनॉलचे पाणी घेण्यासाठी टाळाटाळ करु लागले आहेत. सलग दोन दिवस झालेला पाऊस समाधानकारक झाला आहे.
0 Comments