मोदी, शहांकडे शिंदेंनी गाऱ्हाणी मांडली
मुंबई (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरु असल्याची चर्चा असताना शिंदे यांनी काल दिल्लीत जाऊन भाजप नेतृत्त्वाच्या भेटीगाठी घेतल्या.
गेल्या महिन्याभरात शिंदे तीनवेळा दिल्लीला गेले आहेत. मात्र गेल्या दोन दौऱ्यांमध्ये त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांना रिकाम्या हातानं परतावं लागलं होतं. अखेर काल शिंदे यांना मोदी, शहांची भेट मिळाली. दोन्ही नेत्यांनी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असतानाही शिंदे यांना पुरेसा वेळ दिला. महायुतीत लक्ष घाला, अशी विनंती शिंदे यांनी दोन्ही नेत्यांकडे केली. त्याचवेळी राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्यावर स्पष्टपणे कुरघोडी केली.
महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना, आमदारांना अडचणीत आणलं जात असल्याची एकनाथ शिंदे यांची तक्रार आहे. शिवसेना हा भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष असल्यानं सन्मानाची वागणूक मिळावी, पक्षाच्या मंत्र्यांना अडचणीत आणलं जाऊ नये, अशा मागण्या शिंदे यांनी मोदी, शहांकडे केल्याची सुत्रांची माहिती आहे. फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना गोत्यात आणलं जात असल्याची पक्षातील अनेकांची भावना आहे. याच संदर्भात शिंदे दिल्लीत जाऊन कैफियत मांडताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा कुरघोडी करणारा निर्णय घेत ताकद दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागानं काल आदेश काढला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारित येणाऱ्या नगरविकास विभागानं आधीच यासंदर्भातील आदेश काढलेला होता. आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे अधिकार सामान्य प्रशासन विभागाकडे आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास निवृत्तीमुळे पद रिक्त झालं होतं. त्यामुळे विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी वस्तू आणि सेवा कर आयुक्त असलेल्या आशिष शर्मा यांच्याकडे महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. तसे आदेश उमराणीकर यांनी बुधवारी काढले.
विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभागानं आदेश जारी करण्यापूर्वी नगरविकास विभागानं याबद्दलचे आदेश जारी केले होते. बेस्ट उपक्रम मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येत असल्यानं आणि सध्या महापालिकेचा कारभार नगरविकास विभागाकडून चालवला जात असल्यानं या विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांच्या स्वाक्षरीनं महापालिकेत कार्यरत असलेल्या अश्विनी जोशी यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी काढले होते. शिंदे यांच्या खात्यानं आदेश जारी केलेला असताना फडणवीस यांच्या खात्यानं आदेश काढला. त्यामुळे शिंदे दिल्लीत असताना राज्यातील प्रशासनावरील वर्चस्व फडणवीस यांनी दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
0 Comments