आर्थिक उन्नतीसाठी शेतकर्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा - डॉ. शरद गडाख
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देवून केंद्रातील विविध प्रकल्प, प्रयोग आणि शेतकरी मार्गदर्शन उपक्रमांची पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी सोबत, डॉ. विठ्ठल शिर्के, संशोधन संचालक, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ. नितिनकुमार रनशूर, प्रमुख शास्त्रज्ञ व सहयोगी सशोधन संचालक, अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्प, सोलापूर, डॉ. हितेंद्रसिंग राजपूत, प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, सोलापूर, डॉ. सुनिल कावरे, कृषि विद्यावेत्ता, शेतकर्या,च्या शेतावरील संशोधन केंद्र, मोहोळ हे उपस्थित होते.
या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे यांनी राबविलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले. अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विशेषज्ञ दिनेश क्षिरसागर यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगांबाबत तसेच आगामी कौशल्याधारित कृषी प्रक्रिया उद्योग प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून, केलेल्या नाविन्यपूर्ण कृषी संशोधन, शेतकरी प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसार कार्याचे कौतुक केले. विशेषतः पीक उत्पादनात वाढ, हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती तसेच शाश्वत शेतीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, एकात्मिक शेती त्याचबरोबर एक गांव एक तंत्रज्ञान या माध्यमातून शेतकर्यांेच्या उत्पादन वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्राने काम करणे गरजेचे आहे. दरम्यान राजकुमार आतकरे (राजराणी फळ प्रक्रिया उद्योग, देगाव ता. मोहोळ), अमोल डंके (अनुसया मिलेट व बेकरी प्रक्रिया उद्योग, आष्टी) आणि अभिजीत चेंडके (जितूज मशरूम उद्योग, यावली) यांनी आपल्या उत्पादनांचे मान्यवरांना सादरीकरण केले.
भेटीदरम्यान कुलगुरूंनी नैसर्गिक शेती विषयक “दहा ड्रम थिअरी”चे प्रात्यक्षिक युनिट विषयी श्रीमती. काजल म्हात्रे यांचेकडून जाणून घेतले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. काजल म्हात्रे, दिनेश क्षिरसागर, डॉ. पंकज मडावी, डॉ. सूरज मिसाळ, सुयोग ठाकरे, तुषार आहिरे, नरेंद्र जाधव, ज्ञानेश्वर तांदळे आणि नितिन बागल यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वाती कदम यांनी केले व आभार प्रदर्शन दिनेश क्षिरसागर यांनी केले.
0 Comments