, नीलकंठाच्या भोगावतीनदीच्या पाणी पातळीत वाढ'
पुलावरून जीवघेणा प्रवास
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यातील हिंगणी मध्यम प्रकल्प व ढाळे-पिंपळगाव प्रकल्प परिसरात पुन्हा एकदा पावसाने दमदार बॅटिंग केल्याने प्रकल्पाच्या सांडव्यावरून ओसंडून पाणी वाहत आहे. परिणामी भोगावती व नीलकंठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे.
पिंपरी येथील भोगावतीवरील पूल आठवड्यात चार वेळा पाण्याखाली गेला असून, त्यातूनच विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.
तसेच हिंगणी येथील भोगावती नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून, मळेगाव- हिंगणी- वैराग वाहतूक ठप्प झाली. दगडी पुलावर मोठे खड्डे व मध्यभागी पूल खचल्याने भविष्यात मोठा धोका होण्याची संभावना निर्माण झाली आहे. साकत येथील नीलकंठा नदीवरील पूल देखील अरुंद व पुलाच्या दुतर्फा कठडे नसल्याने धोकादायक बनला आहे. दरवर्षी पावसाळ्यात पूल अरुंद असल्याने हिंगणी, पिंपरी, साकत, मळेगाव येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. संबंधित प्रशासनाने, सरकारने हिंगणी, पिंपरी, साकत येथील अरुंद व धोकादायक पुलाची स्थिती व नागरिकांची होणारी हालअपेष्टा पाहून उंच पुलासाठी मंजुरी देऊन तत्काळ पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पिंपरी (सा) येथील पूल दरवर्षी पावसाळ्यात नेहमीच पाण्याखाली जातो. पुलाची उंची कमी असल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही, रुग्णाला दवाखान्यात नेताना मोठी कसरत करावी लागते. शेतकऱ्यांना जनावरे, शेतमाल वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागते. प्रशासनाने नव्याने पुलाची उभारणी करून नागरिकांचा होणारा त्रास कमी करावा.
-चेतन काशीद, सरपंच, पिंपरी (सा) (ता. बार्शी)
साकत येथील नीलकंठा नदीवरील पुलाचा बराचसा भाग पाण्यात वाहून गेला आहे. पूल अरुंद व कमी उंचीचा असल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. पुलाची उंची वाढवून नवीन पुलाची उभारणी करावी.
---सचिन मोरे, सरपंच, साकत (ता. बार्शी)
0 Comments