स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ऑर्कीड मध्ये अनुभवायला मिळाले देशप्रेम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्कीड स्कुल मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. व्यंकटेश मेतन, संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते, स्कुलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, स्कुलच्या मार्गदर्शिका मीना पारखे, प्राचार्या रुपाली हजारे, ज्यू.कॉलेज प्राचार्या स्मिता कुलकर्णी, व डॉ. वेणू भोजणे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.व्यंकटेश मेतन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. भोजने पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
याप्रसंगी शाळेच्या मैदानावर स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पथ संचलन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्याच बरोबर देशभक्तीपर आधारित विविध प्रकारची नृत्ये सादर केली.यावेळी उपस्थित असणाऱ्या पालक वर्गानी देशभक्तीचा सोहळा अनुभवला.
शाळेच्या प्राचार्या रुपाली हजारे यांनी देशाचा इतिहास सांगत त्याच इतिहासाच्या जोरावर आपण प्रगती कडे वाटचाल करीत असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी आपल्या भाषणात म्हणाले की, आजचा हा सर्व कार्यक्रम पाहून माझ्या मनात जो उद्देश आहे की या शाळेचे विद्यार्थी जगाशी स्पर्धा करतील हा उद्देश ते नक्कीच सार्थ ठरवतील. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.मेतन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ऑपरेशन सिंदूर मध्ये जसे महिलांनी कर्तबगारी दाखविली अगदी त्याच पद्धतीने या शाळेतील स्काउट गाईड मधील विद्यार्थिनी भविष्यात देशातील सुरक्षा व्यवस्थेचा भाग बनून देशसेवा करतील. शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध सादरीकरणाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. शाळेच्या प्रगती साठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीदेवी कनके यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0 Comments