पारंपारिक वाद्याचा वापर करत डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करा- आ. सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- यंदाच्या वर्षांपासून महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव हा राज्यउत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार उत्सवा दरम्यान पारंपारिक वाद्याचा वापर करत डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा असे आवाहन अक्कलकोट चे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. आमदार कल्याणशेट्टी यांनी आवाहन करताच उपस्थित श्री गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील होकार दर्शविला आहे.*
सोमवारी श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री कमलाराजे चौकातील नगरपरिषदेच्या प्रियदर्शनी मंगल कार्यालयात अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया अंतर्गत अक्कलकोट उत्तर-दक्षिण, दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलीस ठाणे अंतर्गत अगामी श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत आमदार कल्याणशेट्टी हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावर यांनी या प्रसंगी प्रास्तविकातुन उपस्थित श्री गणेशमंडळ पदाधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना देऊन बैठकीचा हेतू स्पष्ट केले.
या प्रसंगी व्यासपीठावर या बैठकीस तहसीलदार विनायक मगर पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, नगर नगरपालिकेचे कार्यालय अधीक्षक शैलेश बिराजदार महावितरणचे अभियंता राजू आडम, स. पो. नि. निलेश बागाव, वळसंग पोलीस ठाण्याचे स.पो.नि. अनिल सनगले हे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. कल्याणशेट्टी यांनी पर्यावरणपूरक व आरोग्यदायी श्री गणेशोत्सव साजरा करताना उत्सवातील उत्साह व आनंद कमी होऊ देऊ नका असे आवाहन करत पोलीस अधिकाऱ्यांना श्री गणेश मंडळ सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी श्री गणेशोत्सव व्यवस्थित पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून केवळ पोलिसांवर भार न टाकता गावापातळीवरील स्थानिक सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांनी देखील पुढाकार घेऊन हे दोन्ही उत्सव शांततेत व कायद्याच्या चौकटीत साजरे होण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी गणेशोत्सवातील नियमावली व कायद्यांची माहिती दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, मुस्लिम समाजाच्या वतीने शुकूर शेख, चुंगी चे बालाजी माळगे, प्रा. राहुल रुही आदींनी मनोगत व्यक्त केले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख, आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे,भाजपा नेते महेश हिंडोळे,जेष्ठ नेते अश्पाक बळोरगी,दयानंद बिडवे,नननू कोरबू,फारूक बबर्ची, बुडन तांबोळी, मनसेचे मल्लिनाथ पाटील आदीसह गणेशउत्सव व ईद उत्सव समितीचे पदाधिकारी व पोलीस पाटील मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले तर स. पो. नि. वैभव स्वामी यांनी उपस्थिताना नो डी. जे. नो डॉल्बी ची शपथ देऊन उपस्थितांचे आभार मानले.
चौकट
विशेष प्रमाणपत्र देऊन सत्कार:-
या बैठकीत श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गत आषाढी वारीच्या काळात तंदुरुस्त बंदोबस्त अंतर्गत पोलीस बांधवांकारिता अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध, दुग्धजन्य पदार्थ व भोजनव्यवस्थेकरिता सर्व सुविधा साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सचिन कल्याणशेट्टी व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन श्री स्वामी समर्थ मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments