सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात विविध विकास कामांचा शुभारंभ ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा नियोजन समिती तसेच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत एन.टी.पी.सी.च्या निधीतून हे कामे हाती घेण्यात आली आहेत.
प्राणीसंग्रहालयातील विविध प्राण्यांच्या अधिवास व निवासस्थाने उभारण्यासाठी २.७९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातून काळवीट अधिवास, बिबट्या क्राल परिसर, सिंह काल परिसर आणि मोरांचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन स्थळ विकास व मुलभूत सुविधा अनुदानातून २.९५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होऊन प्राणीसंग्रहालयाच्या पशुवैद्यकीय केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
या विकास कामांमुळे शहरातील पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळणार असून, शालेय विद्यार्थी, पर्यटक व नागरिकांसाठी हे स्थळ शैक्षणिक व मनोरंजनात्मक ठरणार असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, नियंत्रण अधिकारी तपन डंके, उपअभियंता अविनाश वाघमारे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले, माजी महापौर श्रीकांचना यन्नम तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्त डॉ. ओंबासे यांनी प्राणी संग्रहालयात उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती यावेळी दिली.
0 Comments